वाहतूक व्यावसायिकांचा उद्यापासून "चक्‍का जाम'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

नाशिक - ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेस यांच्या आदेशानुसार विविध मागण्यांसाठी देशव्यापी "चक्‍का जाम' आंदोलन पुकारण्यात आले आहे. शनिवारी (ता. 8) मध्यरात्रीपासून सुरू होत असलेल्या या देशव्यापी आंदोलनास नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने पाठिंबा दर्शविला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सातशे व्यावसायिक सहभागी होणार आहेत. त्यांच्या पंधरा हजार गाड्या रस्त्यावर न धावता बंद ठेवल्या जाणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष अंजू सिंघल यांनी दिली.

नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनची नुकतीच बैठक झाली. बैठकीत असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मागण्या पूर्ण होईपर्यंत चक्‍का जाम आंदोलन सुरूच राहील, असे सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीयस्तरावर ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसचे (एआयएमटीसी) अध्यक्ष एस. के. मित्तल व कार्यकारिणीने राष्ट्रीयस्तरावर चक्‍का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनास गाडीमालक, टेंपो असोसिएशन, वाहतूकदार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पाठिंबा असल्याचा दावा सिंघल यांनी केला आहे.

Web Title: transport businessman chakka jam agitation