झळाळी द्या; पण तेवढं पाण्याच्या विल्हेवाटीचं पहा!

संतोष विंचू
रविवार, 8 एप्रिल 2018

येथील बसस्थानकाच्या वाहनतळासह आगाराच्या आवाराचे तप्तमिश्रीत डांबरीकरण करण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला आहे. मात्र बसस्थानकात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची काळजी यापूर्वी घेतली न गेल्याने येथे पाऊस पडताच खड्ड्यांचे साम्राज्य ठरलेले असते.

येवला - नगर, धुळे आणि नाशिक व औरंगाबाद या चार जिल्ह्यांच्या मध्यवर्ती चौफुलीवर असलेल्या येथील बसस्थानकात असणारी बस व प्रवाशांची वर्दळ नक्कीच अधिक आहे. त्यामुळे येथील बसस्थानकाच्या वाहनतळासह आगाराच्या आवाराचे तप्तमिश्रीत डांबरीकरण करण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला आहे. मात्र बसस्थानकात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची काळजी यापूर्वी घेतली न गेल्याने येथे पाऊस पडताच खड्ड्यांचे साम्राज्य ठरलेले असते. हा विचार ध्यानात धरून नव्याने होणारे डांबरीकरण पाण्याचा निचरा कसा होईल याची काळजी करणारे असावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चार जिल्ह्यातील बसच्या ये-जा मुळे येथे बसेसची संख्या सर्वाधिक असते. त्यातच शहरात प्रवेश करण्यासाठीचा हा रस्ता देखील असल्याने बसस्थानकातून खासगी वाहनांची ये-जा ही अधिक प्रमाणात होते. जिल्हाभरातील बसस्थानकांचा विचार करता येथील स्थानकाचा परिसर प्रशस्त आहे. त्यामुळे सहसा येथे कोंडी होत नाही. मात्र यापूर्वी या आवाराचे जेव्हा डांबरीकरण केले गेले. त्यावेळी पाण्याचा निचरा करण्याचे संबंधित ठेकेदाराने फारसे मनावर घेतले. नसल्याने मागील अनेक वर्षे पावसाळ्यात बसस्थानक आवारात मोठे मोठे खड्डे पडून त्यात पाण्याचे डबके तयार होत होते. विशेष म्हणजे आगाराच्या बाजूने बसस्थानकातून नाला देखील वाहत असल्याने पाण्याची विल्हेवाट लावणे तसे सोपे आहे. मात्र काळजी न घेतल्याने पाणी साचून प्रवाशांचे होणारे हाल ही दरवर्षीच नित्याची ठरलेली आहे.

आता बसस्थानक परिसराची खड्डेमय अवस्था दूर करण्यासाठी महामंडळाने तब्बल १५ लाख ८५ हजारांची निविदा प्रसिद्ध केली आहे. पुढील दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.मात्र काम करताना पाण्याची योग्य विल्हेवाट लागली जावी हा विचार ध्यानात घ्यायला हवा यामुळे केलेले डांबरीकरण अधिक दिवस टिकून प्रवाशांना बसमध्ये धक्के खाण्याची वेळ येणार नाही हे नक्की!!

याशिवाय महामंडळाने आगाराच्या डांबरीकरणाला देखील निधी मंजूर केला आहे. तर मागील आठवड्यात बसस्थानकाचे जुनाट झालेली पत्रे देखील बदलले गेले आहे. यामुळे बसस्थानकाला झळाळी मिळाली असली तरी उन्हाळा सुरू असल्याने पूर्वीप्रमाणेच पंखे बसविण्याची अपेक्षा प्रवाशांना आहे. पत्रे खोल्यानंतर आठवडाभर काम रेंगाळून प्रवाशांना उन्हात बसण्याची वेळ आली होती. अशी अवस्था मात्र डांबरीकरणाच्या कामाची होऊनही हीदेखील अपेक्षा आहे. येथे प्रवाशांची वर्दळ अधिक असल्याने तसेच ग्रामीण भागातून रोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असल्याने बसस्थानकाचा परिसर बसण्यासाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे बाजूला असलेल्या जागेत विध्यार्थ्यांसाठी नव्याने शेड बांधण्याची गरज आहे. बसस्थानाकाच्या आवारातील स्री व पुरुष शौचालय हे जुनाट झाले असुन शौचालयाचे बांधकामही नविन करण्याची तसेच बसस्थानाकाच्या आजूबाजूला काटेरी झुडपे वाढल्याने ते काढून परिवहन विभागाने आखत्यारीत येणार्या संपुर्ण जागेला सिमेंट वालकंपांऊंड करणे गरजेचे आहे.

जिल्हयातील बसस्थानकांना डांबरीकरनातून नवे रूप
* नामपूर बसस्थानक : १६ लाख २ हजार
* येवला बसस्थानक : १५ लाख ८५ हजार
* येवला आगार : १५ लाख ६२ हजार
* दिंडोरी बसस्थानक : १५ लाख ५३ हजार
* वणी बसस्थानक : १५ लाख ३५ हजार
* लासलगाव बसस्थानक : १५ लाख २० हजार
* चांदोरी बसस्थानक : १४ लाख ३५ हजार 

"प्रशासनाकडून बसस्थानाकाच्या परिसराचे डांबरीकरण पावसाळयापूर्वी व मजबुत व्हावे.पावसाचे पाणी जागेवर न साचुन राहता ते मोठ्या नाल्याला जावुन मिळेल याची काळजी घ्यावी. तसेच प्रवासी संख्या वाढल्याने आत्ताच्या शेडजवळ असलेल्या रिकामी जागी विद्यार्थ्यांसाठी नविन शेड उभरावे." असे मत येवला येथील नागरीक राहुल लोणारी यांनी व्यक्त केली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The Transport Corporation has decided to do road work at bus station at Yevla