लोकसहभागातून तीन वर्षांत राज्यात 50 कोटी वृक्षारोपण - मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

नाशिक - येत्या तीन वर्षांमध्ये लोकसहभागातून राज्यात 50 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, वनक्षेत्रात येणाऱ्या स्थानिकांनाच्या रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.

नाशिक - येत्या तीन वर्षांमध्ये लोकसहभागातून राज्यात 50 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, वनक्षेत्रात येणाऱ्या स्थानिकांनाच्या रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.

नाशिकला वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या सहाव्या राज्यस्तरीय परिषदेसाठी ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये उपस्थित होते. तेथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""राज्यात खासगी कंपन्यांच्या सहभागाने विकास करण्यासाठी वन विभाग पुढाकार घेत आहे. यासाठी टाटासारख्या नामांकित कंपन्यांची मदत घेतली जात आहे. वृक्षलागवडीचे उद्दिष्ट वन विभाग एकटे करू शकणार नाही. यासाठी नागरिकांनीही यात सहभाग घ्यावा. "मनरेगा'च्या माध्यमातून वृक्षलागवडीमधून एक हजार झाडांमागे एक कुटुंब कार्यरत आहे. वन विभागात प्रगत तंत्रज्ञान वापरून विविध नामांकित कंपन्यांच्या मदतीने वनक्षेत्रातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.

पुणे, चंद्रपूरसह राज्यातील विविध शहरांमध्ये "सीएसआर' निधीतून कामे करण्याचे आवाहन कंपन्यांना करून ते म्हणाले, ""राज्यात जंगलांमध्ये आढळणाऱ्या मोहफुलाला बाहेर चांगली बाजारपेठ असून, यातून 220 कोटींचे उत्पन्न होऊ शकते. अशा प्रकारच्या उद्योगनिर्मितीसाठी आमचे प्रयत्न आहेत. "कॉल सेंटर'च्या माध्यामातूनही वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड, शिकार, तक्रारी नोंदविण्यासाठीही अद्ययावत प्रणाली सुरू करण्यात आली आहे.''

परिषदेच्या पहिल्या दिवशी मुनगंटीवार यांनी तीन महिन्यांत राज्यात राबविलेल्या योजना आणि कामांचा आढावा घेतला. मुनगंटीवार यांच्या हस्ते 30 हून अधिक वन विभागाशी संबंधित पुस्तकांचे प्रकाशनदेखील या वेळी करण्यात आले.

Web Title: tree plantation 50 caror