Water Supply Scheme : 15 मार्चपर्यंत ‘ट्रायल’, एप्रिलमध्ये प्रत्यक्ष पाणी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akkalpada water supply scheme work in progress for Dhule city

Water Supply Scheme : 15 मार्चपर्यंत ‘ट्रायल’, एप्रिलमध्ये प्रत्यक्ष पाणी?

धुळे : राजकारण्यांसाठी प्रचाराचा विषय मात्र धुळेकरांची एक मूलभूत गरज भागविणारी अत्यंत महत्त्वाकांक्षी व बहुप्रतीक्षित अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची १५ मार्चपर्यंत ट्रायल सुरू होईल व एप्रिलमध्ये धुळेकरांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा (Water Supply) करता येईल,

असा विश्‍वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (trial of Akkalpada water supply scheme will start by March 15 In April actual water supply will be available dhule news)

अधिकाऱ्यांचा हा विश्‍वास खरा ठरो आणि भर उन्हाळ्यात धुळेकरांना मुबलक व नियमित पाणी मिळो अशीच सदिच्छा असणार आहे. धुळेकरांना साधारण वर्षभर पाणीपुरवठ्यासाठी कसरत करावी लागते. कधी पंप खराब, कधी पाइपलाइन फुटली, कधी वीजपुरवठा खंडित, तर कधी दुरुस्तीचे काम अशा एक ना अनेक कारणांनी शहरात कुठेना कुठे पाणीपुरवठा विस्कळित झालेला असतो.

विशेष म्हणजे धुळेकरांना किमान चार दिवस ते कमाल दहा-पंधरा दिवसांनंतर पाणीपुरवठ्याची सवय आता अंगवळणी पडली आहे. त्यामुळे दररोज तर सोडाच पण दिवसाआड पाणी मिळेल हे धुळेकरांसाठी स्वप्नच आहे. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी भटकंती पाहायला मिळते. या सर्व समस्यांतून मार्ग काढण्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना आणली गेली.

अमृत योजनेंतर्गत १४ फेब्रुवारी २०१९ ला राज्य शासनाने योजनेला मंजुरी दिली. त्यानंतर निविदाप्रक्रिया सुरू झाली. सुरवातीला १५३ कोटी १३ लाख रुपये खर्चाची ही योजना होती. नंतर ९ ऑगस्ट २०१९ ला या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

त्यामुळे योजनेची किंमत १६९ कोटी १३ लाख रुपये झाली. अर्थात यात तापी पाणीपुरवठा योजना व डेडरगाव योजनेच्या दुरुस्तीचा समावेश आहे. साधारण अकरा-बारा कोटी रुपये यासाठी खर्च आहे.

योजनेची प्रतीक्षा

कार्यादेशानंतर १८ महिन्यांत योजना पूर्ण करण्याचा कालावधी होता. दरम्यानच्या काळात कोविड संकटासह इतर विविध अडथळे येत गेले. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या आहेत. अद्याप त्या थांबलेल्या नाहीत. राजकीय मंडळींसाठी ही योजना म्हणजे प्रचारासाचा मोठा विषय आहे. त्यामुळे दावे-प्रतिदावे सुरू असतात.

दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वतः या योजनेकडे लक्ष घालून, प्रत्यक्ष पाहणी करून कामात येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर योजनेला गती आल्याचे दिसते. या सर्व घडामोडींत योजना कधी पूर्ण होईल याची धुळेकरांना प्रतीक्षा कायम आहे.

अधिकाऱ्यांचा विश्‍वास

दरम्यान, या कामावर लक्ष ठेवून असलेल्या उपायुक्त विजय सनेर यांनी बुधवारी (ता. २८) योजनेच्या कामाची पाहणी केली, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले सोबत होते. जलवाहिनीचे काम, फिल्ट्रेशन प्लांट, ३३ केव्ही सबस्टेशन आदी कामांची त्यांनी पाहणी केली. विविध टप्प्यांवर योजनेचे काम सुरू आहे.

मात्र, संपूर्ण योजनेचा विचार केल्यास सुमारे ८५ ते ९० टक्के योजनेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १५ मार्चपर्यंत योजनेचे ट्रायल सुरू होईल व १ एप्रिलपासून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होईल, असा विश्‍वास उपायुक्त सनेर यांनी व्यक्त केला. अधिकाऱ्यांचा हा विश्‍वास ‘एप्रिल फुल’ न ठरो एवढीच धुळेकरांची अपेक्षा असणार आहे.