आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहांचे रूपडे पालटणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

आदिवासी विभागात स्वतंत्र बांधकाम विभाग कार्यान्वित करण्यात आल्याने आता अनेक कामे तातडीने मार्गी लागणार आहेत. यासाठी मुख्य अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, अधीक्षक अभियंत्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर, नाशिक आणि मुंबई या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत.
- राजीव जाधव, आदिवासी आयुक्त

नाशिक - आदिवासी विकास विभागाच्या 529 आश्रमशाळा व 491 वसतिगृहांची दुरुस्ती तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. यासाठी आदिवासी विभागात स्वतंत्र बांधकाम विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्यासह 18 हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता मिळाली. सर्वप्रथम स्वच्छतागृहांच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 260 आश्रमशाळा व वसतिगृहांची दुरुस्ती सध्या सुरू आहे. मात्र, उर्वरितांपैकी अनेक आश्रमशाळा व वसतिगृहांची स्थिती बिकट आहे. आश्रमशाळा व वसतिगृहांच्या दुरुस्ती, बांधणी व इतर कामे आदिवासी विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतो. यामुळे अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. आता ही सर्व कामे आदिवासी विभागामार्फत केली जाणार आहेत. यासाठी आदिवासी विभागात स्वतंत्र बांधकाम विभागाची निर्मिती करण्यात आली. यासाठी मुख्य अभियंत्यांसह अधीक्षक अभियंत्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून आदिवासी विभागाच्या सर्व अप्पर आयुक्त स्तरावर कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांची नियुक्ती केली जाणार आहे.

तीन टप्प्यांत होणार कामे
नव्या बांधकाम विभागामार्फत स्वच्छतागृहे, किचन, डायनिंग, खोल्यांची दुरुस्ती आणि नंतर शाळेचा परिसर, संरक्षक भिंत यांसारखी कामे हाती घेतली जातील. दुसऱ्या टप्प्यात राज्यात रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या 150 शासकीय आश्रमशाळा व 50 वसतिगृहांची कामे पूर्ण केली जातील. यानंतर तिसऱ्या टप्प्यात नवीन बांधकामे करण्यात येतील.

Web Title: Tribal ashramshala, hostel development