वाघबारशीने आदिवासी बांधवाच्या दिवाळीची उत्साहात सुरुवात

वाघबारशीने आदिवासी बांधवाच्या दिवाळीची उत्साहात सुरुवात

वणी (नाशिक) :  तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवास रविवारपासून गाय-वासरू पूजन अर्थात वसुबारसने तर आदिवासी दुर्गम भागात दिवाळीची सुरुवात वाघबारशीने झाली आहे. आज आदिवासी बांधवांनी पांरपारीक पद्दतीने  जंगलात जाऊन निसर्गदेवतेचे पुजन केले आहे.

हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा व महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळी म्हटली की गोडधोड पदार्थ, नवीन कपड्यांची खरेदी, फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज असा हा आंदोत्सवाचा सण साजरा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आदिवासी बांधवही हाच सण अतिशय वेगळ्या पांरपारीक पद्धतीने साजरा करतात. वाघासारख्या हिंस्त्र श्वापदापासून गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणून आदिवासी ग्रामीण भागात वाघबारस साजरी करण्याची प्रथा आहे.

वसूबारसेच्या म्हणजे आदिवासींच्या वाघबारशीच्या दिवशी गुरे चारणारे गुराखी (बाळदी) नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी जंगलात जातात. या दिवशी सर्व गुराखी उपवास करतात. आदिवासींनी वाघाला देव मानले आहे. म्हणूनच काही भागांत वाघोबाची मंदिरे पाहावयास मिळतात. अनेक ग्रामदैवतांच्या मंदिराच्या बाहेर वाघांच्या मूर्ती आहेत. या सणाच्या आधी एक महिना आदिवासींचे सारे देव रानात पारध करण्यासाठी गेलेले असतात. ते वाघबारसेला घरी येतात. त्यामुळे या दिवसाला आदिवासी जीवनात एक वेगळे महत्त्व आहे. वाघबारसच्या निमित्ताने आदिवासी शेतकाम बंद ठेवतात. वाघबारसला प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व तिखट नैवद्यासाठी (बोकड) वर्गणी गोळा केली जाते. 

वाघ देवतेचे मंदिर हे गावाच्या वेशीवर असते. मंदीरात दगडी चिऱ्यावर काही ठिकाणी लाकडा वर वाघ देवता, नागदेवता, मोर, सुर्य, चंद्र यांची चित्रे कोरलेली असतात. वाघबरसच्या दिवशी वाघ मंदीराच्या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळी, भगत, मुले, मुली नवीन कपडे घालून एकत्र येतात. यावेळी गाईचे शेण, गोमूत्राने वाघोबाच्या मंदिराचा संपूर्ण परिसर शिंपडून सुश्चित करतात. त्यानंतर आदिवासी भगत रुढी पंरपरेनूसार वाघदेव, नागदेव, सुर्यदेव, चंद्रदेव, धरतीमाता जंगलाची, निसर्गाची पुजा करतात. पुजेवेळी देवताच्या मुर्तीला शेंदुर लावून दुध व पाण्याने आंघोळ घालतात. पुजेत तांदुळ, नागली, पाचखाद्य, अगरबत्ती दिवा लावून पुजन केले जाते. पुजाविधी झाल्यानंतर ग्रामस्थ नारळ, गोड पदार्थाचा नैवद्य दाखवितात. दिंडोरी, कळवण, सुरगाणा, सटाणा, इगतपूरी  तालुक्यातील बहुतेक भागात वाघदेवतेला गोड नैवद्या बरोबरच तिखट (बोकडाचा नैवद्य) दर्शविला जातो. 

संध्याकाळी गावातील सर्व गुरे, पाळीव प्राणी वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणून पुजन केले जाते. यानंतर गावातून गुराखी गाने गात गुरुांची मिरवणूक काढली जाते. 'आली वर्षाची दिवाळी हो...आली वर्षाची दिवाळी... गाई म्हशीला ओवाळी हो...बहीन भावाला ओवाळी.. आली वर्षाची धींडवाळी... या सारे गीत गावून आदिवासी बांधव मनोभावे पुजा करतात. धनधान्य पिकू दे, सर्वांना सुखी ठेव,  गुराढोरांना सुखी ठेव अशी मनोभावे  प्रार्थना करीत वाघबारस मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दरम्यान सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या भातोडे येथील जंगलात भातोडे गावातील आदिवासी बाधंवानी निसर्गदेवतांची पांरपारीक पुजा केली. यावेळी भगत बाजीराव महाले, दशरथ महाले, मोतीराम महाले, सुरेश महाले, रमेश महाले, जयराम महाले व भातोडे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com