आदिवासी महिलेने जन्म दिलेले तिळे दगावले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

वैद्यकीय सेवा न मिळण्याचा फटका - प्रशासनाची हलगर्जी, संबंधितावर कारवाईची श्रमजीवी संघटनेची मागणी

वैद्यकीय सेवा न मिळण्याचा फटका - प्रशासनाची हलगर्जी, संबंधितावर कारवाईची श्रमजीवी संघटनेची मागणी
नाशिक - आदिवासी महिलेने सहाव्या महिन्यात जन्म दिलेले तिळे दगावले आहे. ही घटना रायपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे घडली असून, अर्भक मृत्यूच्या प्रश्‍नाने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. गरोदर असताना आणि बाळंत झाल्यावर वैद्यकीय सेवा मिळाली नसल्याची तक्रार करत श्रमजीवी संघटनेतर्फे कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

टाके देवगाव या आरोग्य उपकेंद्रापासून पाच किलोमीटरवर असलेल्या सुनीता पांडू वारे (वय 25) या महिलेला रात्रीच्या वेळी त्रास होऊ लागला. तिने या त्रासाबद्दलची माहिती स्थानिक कर्मचाऱ्यांना दिली. मात्र वैद्यकीय सेवा उपलब्ध न झाल्याने तिचे बाळंतपण घरी झाले. बाळंत झाल्यावर तीन अपत्यांपैकी मुलगा दगावला. मात्र मुलगी आणि मुलगा दुसऱ्या दिवसापर्यंत ठीक होते. त्र्यंबकेश्‍वर पंचायत समितीतर्फे अर्भकांसह महिलेला आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. दुसरीकडे मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहन उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पण दोन्ही अर्भकांना वाचविण्यात यंत्रणेला यश आलेले नाही.

प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर
गरोदर असलेली महिला जोखीमग्रस्त होती. त्यामुळे तिच्या इलाजासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या महिलेची गरोदर म्हणून नोंद झाली होती. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आरोग्यसेविकेने तिची एकदा तपासणी केली होती. प्रत्यक्षात मात्र गरोदर आदिवासी महिलेचे लसीकरण झाले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याशिवाय संस्थात्मक प्रसूतीच्या नावाखाली प्रशासनाकडून या घटनेची वाच्यता झाली नाही. मात्र श्रमजीवी संघटनेने हे प्रकरण उचलून धरल्याने आता यंत्रणेची भंबेरी उडाली आहे. अर्भक 800 ते 900 ग्रॅम वजनाचे आणि कमी कालावधीचे असल्याने आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती तयार झाल्याचे सांगण्यात आले.

गुन्हा दाखल करण्याचा आग्रह
श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे, माजी सैनिक श्‍यामराव लोंढे आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्र्यंबकेश्‍वर पंचायत समितीत रायपाडा प्रकरणाबद्दल कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले आहे. त्याद्वारे अर्भकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. गरोदरपणामध्ये आरोग्यसेवा मिळाली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Web Title: tribal womens three babys death