सटाणा : रंगांचे डबे घेवून जाणाऱ्या ट्रकला अपघात

रोशन खैरनार
बुधवार, 29 मार्च 2017

गुजरातकडून कर्नाटक राज्यात रंगांचे डबे घेवून जाणारा मालवाहू ट्रक बसस्थानकाजवळील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी महामार्गाच्या दुभाजकाला धडकून पलटी झाल्याने मोठा अपघात घडला.

सटाणा - वेळ मध्यरात्री दोन वाजेची...शांत झोपेत असलेले सटाणा शहर...शहरातील राज्य महामार्गावर पसरलेला शुकशुकाट...निरव शांततेत अचानक काहीतरी भयानक आवाजामुळे भयभीत होवून जागे झालेले शहरवासीय... हा प्रसंग आहे आज मध्यरात्री सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर घडलेल्या भीषण अपघाताचा...

गुजरातकडून कर्नाटक राज्यात रंगांचे डबे घेवून जाणारा मालवाहू ट्रक बसस्थानकाजवळील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी महामार्गाच्या दुभाजकाला धडकून पलटी झाल्याने मोठा अपघात घडला. सुदैवाने मध्यरात्रीची वेळ असल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. महामार्गावरच ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून पोलिसांनी एकेरी वाहतुक सुरु केली आहे. मात्र या अपघातामुळे सटाणा शहर वळण रस्त्याचा प्रलंबित प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गुजरात राज्यातील अंकलेश्‍वर येथून एशियन पेंटस्‌ कंपनीच्या रंगांचे डबे घेवून मालवाहू ट्रक (क्र.एम.एच.12 ई.एफ. 9765) बंगलोर (कर्नाटक)कडे निघाला होता. आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारा हा ट्रक शहरातील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर बसस्थानकाजवळील दुभाजकावर आदळला. या अपघातात ट्रकच्या पुढील भागाची चाके निखळून ट्रक महामार्गावरच पलटी झाला. यामुळे ट्रकमधील रंगांचे काही डबे फुटून महामार्गावर सर्वत्र रंग पसरला. मध्यरात्री महामार्गावर कुत्रे आडवे आल्याने अपघात झाल्याचे ट्रकचालकाचे म्हणणे आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती समजताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिस प्रशासनाने महामार्गावरून एकेरी वाहतुक सुरु केली आहे.

दरम्यान, ट्रकमधील रंगांचे सर्व डबे दुसऱ्या मालवाहू ट्रकमध्ये टाकल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक उभा केला जाणार आहे. मात्र या घडामोडीत भरपूर वेळ खर्ची पडणार असल्याने महामार्गावरील वाहतुक दुपारपर्यंत विस्कळीत राहणार आहे.
शहरातून जाणारा विंचूर-प्रकाशा राज्य महामार्ग गेल्या काही वर्षांपासून मृत्युचा सापळा बनला आहे. या महामार्गावर सातत्याने अपघातांची मालिका सुरु असल्याने आजपर्यंत शेकडो निरपराध नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुभाजकाला कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्‍टर नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनचालकाला दुभाजक दिसत नाहीत व अपघात घडतात. आजपर्यंत विविध सामाजिक संघटनांनी सटाण शहर वळण रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आंदोलने केली आहेत. मात्र वळण रस्त्याचे काम अद्यापही प्रलंबित आहे. केंद्र शासनाने नुकताच या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा बहाल केला असून मध्यप्रदेश ते कर्नाटक राज्यापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरु होण्यास किती कालावधी लागतो, हे सांगणे अवघड आहे. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी नुकतीच केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महामार्गावरील साक्री ते येवला पर्यंतच्या महामार्गाचे चौपदरीकरण करून सटाणा शहराच्या पुर्व व पश्‍चिम बाजुकडील वळण रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

Web Title: truck accidents by taking the chromatic coaches in Satana