क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून न्यायला ट्रकच देणार नकार!

क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून न्यायला ट्रकच देणार नकार!

एसएसबीटी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी साकारले मॉडेल
जळगाव - अतिरिक्त मालवाहतुकीचा गैरवापर थांबवण्यासाठी व अतिरिक्त भार वाहून नेल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्‍ट्रिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी मालवाहू वाहनात बसविण्यासाठी एक सुरक्षित यंत्रणा तयार केली आहे. क्षमतेपेक्षा अधिक माल भरल्यास वाहन सुरूच होणार नाही आणि त्याचा संदेश चालकाला बझरद्वारे मिळणार आहे.

आजकाल भारतात मालाची आयात निर्यात करण्यासाठी वाहनांचा उपयोग करून त्यावर अतिरिक्त भार वाहून नेला जातो. मोटार वाहन कायदा कलम १९४ नुसार अतिरिक्त भार प्रतिटन नुसार दोन हजारांपर्यंत असा दंड आहे. तरीदेखील कायदा तोडून अतिरिक्त म्हणजे क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेला जातो. असा अतिरिक्त भार वाहून नेल्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होते. भारतात जवळजवळ दिवसाला ३०० अपघात होतात. या अपघातांना आळा बसावा म्हणून विद्यार्थ्यांनी अभिनव तंत्रशुद्ध पद्धत शोधली आहे. 

या यंत्रणेचा वापर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. या पद्धतीनुसार वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल भरल्यास वाहन सुरू होत नाही किंवा चालू वाहन बंद होते. अतिरिक्त माल भरल्याचा संदेश वाहनचालकाला समोरील डॅशबोर्डवर (स्क्रीनवर) दिसतो. तसेच बझरदेखील वाजतो.

समजा, या पद्धतीने एखाद्या मालवाहतुकीसाठी एखाद्या ट्रकमध्ये ज्याची क्षमता ६ टनांची आहे आणि जर ६ टनांपेक्षा अधिक वजन भरल्यास अशावेळी ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास तो सुरूच होणार नाही. जास्त वजन भरल्याचा संदेश चालकाला दिसेल. क्षमतेपेक्षा अधिक असलेला भार कमी केल्यास वाहन पुन्हा सुरू करता येईल.

ही यंत्रणा तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना ७ हजार रुपये खर्च आला. इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील ऋचा बेलसरे, स्वाती वानखेडे, सौरभ वाघोदे, प्रशांत नारखेडे, समीर तडवी या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प यशस्वीरीत्या तयार केला आहे. सरकारने या पद्धतीचा अवलंब करावा अशी अपेक्षा या तरुण अभियंत्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पासाठी प्रा. एन. एस. महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

असे आहेत फायदे
कमी खर्चात होणार अपघातांवर मात
आरटीओसाठी उपयुक्त तंत्रज्ञान
वाहनावरचा लोड कमी होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com