खऱ्या अर्थाने आज लढाई जिंकलो - पिचड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

नाशिक - राजकारणात समाजाच्या रक्षणासाठी अनेक लढाया केल्या; मात्र स्वतःच्या जातीसाठी लढाई केल्यानंतर आज खऱ्या अर्थाने कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र मिळाल्याची भावना माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केली. हा माझा विजय नसून, तो संपूर्ण आदिवासी समाजाचा असल्याचे सांगताना, राजकारणातून निवृत्ती घेतल्याचेही त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

नाशिक - राजकारणात समाजाच्या रक्षणासाठी अनेक लढाया केल्या; मात्र स्वतःच्या जातीसाठी लढाई केल्यानंतर आज खऱ्या अर्थाने कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र मिळाल्याची भावना माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केली. हा माझा विजय नसून, तो संपूर्ण आदिवासी समाजाचा असल्याचे सांगताना, राजकारणातून निवृत्ती घेतल्याचेही त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

या प्रसंगी कार्यकर्त्यांनी जातप्रमाणपत्र मिळताच पेढे वाटून आदिवासी आयुक्तालयाबाहेर एकच जल्लोष केला. अनुसूचित जमाती जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे आज मधुकर पिचड यांना कोळी महादेव जातीचे वैध प्रमाणपत्र नव्याने देण्यात आले. या वेळी जातवैधता प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी माजी आमदार पांडुरंग गांगड, शिवराम झोले, देविदास पाटील आदी उपस्थित होते.

माजी मंत्री मधुकर पिचड हे बोगस आदिवासी असल्याचा आरोप करत माजी आमदार संजय चव्हाण यांनी याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयात पिचड यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ठाकूर, जगजितसिंग यांनी मधुकर पिचड यांच्या बाजूने निकाल देत जातपडताळणी समितीला नव्याने जातप्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते. श्री. पिचड यांना आज कोळी महादेव जातीचे वैध प्रमाणपत्र देण्यात आले.

आता राजकारणातून निवृत्ती
जातप्रमाणपत्र मिळाल्यानंतर पिचड यांनी आयुष्यात स्वत:च्या जातीबद्दल करावी लागणारी लढाई जिंकलो आहे आणि आता ही माझी अखेरची लढाई असून, यापुढे कुठलीही निवडणूक लढविणार नाही. फक्त पक्ष विसरून आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात वाटेल तिथे जाणार असल्याचे सांगितले. सात वेळा विधानसभेत पाठविल्याबद्दल सर्वांचे आभार मानताना आता मरणदेखील आले तरी आनंदच होईल, अशी भावना व्यक्त केली.

आमची जात ठरविणारे "टाटा' कोण?
धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी आमच्या आदिवासी समाजाची जात ठरविणारे हे "टाटा' कोण? याबाबत 22 मार्चला मुंबईत होणाऱ्या बैठकीत त्यांना जाब विचारणार असल्याचे पिचड यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना पिचड म्हणाले, की आमच्या आदिवासींची जात ठरविणारे हे "टाटा' कोण आहे. टाटा सामाजिक संस्थेची आम्हाला गरज नसल्याचेही या वेळी पिचड यांनी ठणकावून सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणासाठी जी तत्त्वे लागू केलीत, तीच आम्हाला मान्य आहेत.

Web Title: Truly won the battle today