व्यवस्थित काम करा, अन्यथा निलंबन - मुंढे

Tukaram-Munde
Tukaram-Munde

नाशिक - एक मेस कामगार, कर्मचाऱ्यांना शाबासकी देण्याचा दिवस असला तरी महापालिका मात्र अपवाद ठरली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेत थेट निलंबनाची धमकी दिल्याने कर्मचारी, कामगार गांगरून गेले आहेत. आपल्याकडून काही चुकले का? चुकले असेल तर सर्वच कर्मचाऱ्यांना फैलावर घेण्याचा काय कारण? अशा प्रश्‍नांची सोडवणूक करताना कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र दिन साजरा झाला.

पालिका मुख्यालयात महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना एका रांगेत उभे राहण्याच्या सूचना विभागप्रमुखांमार्फत दिल्या. कर्मचारी सरळ रेषेत उभे राहिले. जे उभे राहिले नाहीत त्यांना आयुक्तांनी त्यांच्या भाषेत शिस्तीचे धडे देत सरळ रेषेत उभे केले. प्रारंभी मी तुम्हाला चहा पाजतो, असे म्हटल्यानंतर कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. चहापान झाल्यानंतर मात्र आयुक्तांनी विभागनिहाय कर्मचाऱ्यांना फैलावर घेण्यास सुरवात केली. पहिल्या फेरीत नगररचना विभागाला धारेवर धरले.

एका कर्मचाऱ्याने सचिवपातळीवरील नातेवाइकांकरवी मुंढे यांनी केलेली कारवाई मागे घेण्याचा संदर्भ देत माझ्यावर दबाव आणायचा असेल त्यांनी त्यांच्या घरी कामाला जावे, असे खडसावत वार्तालापाची दिशा स्पष्ट केली. त्यानंतर आयुक्तांनी कर्मचाऱ्यांवर सुरू केलेले शाब्दिक वॉर तासभर सुरूच होते. माझी कोणी बदली करू शकत नाही, दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा, मला हजर होऊन ९ तारखेला नव्वद दिवस होत असतानाही कामकाजात सुधारणा दिसत नाही. एकालाही काम करता येत नाही. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणार असून, त्यात नापास झाल्यास निलंबनाला सामोरे जाण्याची धमकी दिली. एका कर्मचाऱ्याच्या बोटातील सोन्याच्या अंगठीचा संदर्भ देत श्रीमंती घरी दाखविण्याचा सल्ला दिला.

डॉ. गेडाम यांची आठवण
आयुक्त मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना का फैलावर घेतले, आपल्याकडून काही चुका झाल्या आहेत का? चुका झाल्या असतील तर थेट संबंधितांवर कारवाई करायला हवी. हजार, बाराशे कर्मचाऱ्यांना फैलावर घेण्याची गरज नव्हती. चुकी नसतानाही आयुक्तांच्या शब्दफेकीमुळे घायाळ झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप काय झाले ते कळत नसल्याने अजूनही पालिका वर्तुळात महाराष्ट्रदिनी आयुक्तांच्या वर्तनाची चर्चा सुरू आहे. माजी आयुक्त डॉ. गेडाम हेही कर्तव्यकठोर अधिकारी होते; परंतु चुकीचे काम करणाऱ्यांना शिक्षा, तर चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी गुणवंत कामगार उपक्रम राबविल्याची आठवण कर्मचाऱ्यांना आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com