तूर लागवडीचा 'जळगाव पॅटर्न' यंदा यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

जळगाव - गेल्या दोन वर्षांत सर्व प्रकारच्या डाळींचे दर कमालीचे वाढलेले असताना सरकारने डाळवर्गीय पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देणारी योजना राबविली. त्यात जळगाव जिल्ह्याने विशेषत: तूर लागवडीच्या क्षेत्रात जवळपास दुपटीने वाढ केली असून, यंदा समाधानकारक पावसामुळे तुरीचे जिल्ह्यातील उत्पादनही बऱ्यापैकी वाढणार असल्याचा दावा कृषी विभागामार्फत केला जात आहे. तूर लागवडीचा "जळगाव पॅटर्न' राज्यात यशस्वी ठरल्याचे यामुळे मानले जात आहे.

दोन वर्षांत सर्वच प्रकारच्या डाळींचे दर गगनाला भिडले होते. सर्वसामान्यांच्या नेहमीच्या खाण्यात असलेल्या तूरडाळीचा भाव गेल्या वर्षी थेट दोनशे रुपयांपर्यंत पोहोचला. कमी उत्पादन, मागणीत वाढ व साठेबाजीमुळे ही दरवाढ झाली होती, त्याचा परिणाम अगदी दिवाळीनंतरही कायम होता. त्यामुळे गेल्या खरीप हंगामात डाळवर्गीय पिकांवर भर देण्यासाठी सरकारने प्रोत्साहन देण्याची योजना राबवली. राज्याचे तत्कालीन महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

तूरडाळीचे लागवड क्षेत्र वाढले
जिल्ह्यात तूर लागवडीखालील प्रस्तावित क्षेत्र 170.47 हेक्‍टर आहे. गेल्या हंगामात कृषी विभागाने नियोजनबद्ध राबविलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात यंदा सुमारे 302.79 हेक्‍टर क्षेत्रात तूर लागवड झाली. हे प्रमाण 177.62 टक्के आहे. याशिवाय, अनेक शेतकऱ्यांनी कपाशीतही आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली.

या केल्या उपाययोजना
तूर लागवडीला चालना मिळावी म्हणून तुरीच्या रोपवाटिका तयार करण्यात आल्या. शेडनेट व पॉलिहाऊसची सुविधा असणाऱ्या काही शेतकऱ्यांना हे तंत्र कृषी विभागाने पुरविले. त्या माध्यमातून जिल्ह्यात ठिकठिकाणी उन्हाळ्यात एप्रिल-मेमध्येच तुरीच्या रोपांची लागवड करण्यात आली. यासाठी मर्यादित पाण्याचा वापर करुन तुरीची रोपे तयार करण्यात आली. पाऊस सुरु झाला व पेरण्यांची वेळ आली तेव्हा ही रोपे चांगली सशक्त व पुरेशी मोठी झाली होती. नंतर ही रोपे शेतकऱ्यांना विकण्यात आली. तयार व सक्षम रोपे मिळाल्याने हंगामात त्यांची चांगली वाढ झाली. या उपाययोजनांमुळे तुरीच्या उत्पादनातही यंदा मोठी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: tur cultivation jalgav pattern success