"गुगल'वरून ट्रॅव्हल्स कंपनीचा मोबाईल क्रमांक घेणे पडले महागात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

शहरातील एका नामांकित ट्रॅव्हल्स कंपनीमधून बसचे तिकीट बुक करण्यासाठी विद्यार्थिनीने गुगल सर्च इंजिनवरून मोबाईल क्रमांक मिळवला. त्या क्रमांकावर संपर्क करून पुण्याचे तिकीट बुक करण्यासाठी शंभर रुपये ऍडव्हान्स बुकिंगसाठी ऑनलाइन अदा करताना, एटीएमचा "ओटीपी' सांगितला गेला.

जळगाव - शहरातील एका नामांकित ट्रॅव्हल्स कंपनीमधून बसचे तिकीट बुक करण्यासाठी विद्यार्थिनीने गुगल सर्च इंजिनवरून मोबाईल क्रमांक मिळवला. त्या क्रमांकावर संपर्क करून पुण्याचे तिकीट बुक करण्यासाठी शंभर रुपये ऍडव्हान्स बुकिंगसाठी ऑनलाइन अदा करताना, एटीएमचा "ओटीपी' सांगितला गेला. त्याचा गैरफायदा घेत भामट्याने या विद्यार्थिनीच्या खात्यातून 24 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. 

जळगाव शहरातील नामवंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींना खासगी बसचे तिकीट हवे होते, गुगल सर्च इंजिनवर शहरातील ट्रॅव्हल्स कंपन्यांचा शोध घेत त्यांनी एक क्रमांक मिळवला. ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावाने गुगलवर असलेल्या (8207521020) या क्रमांकावर तिकिटासाठी या विद्यार्थिनीने विचारणा केल्यावर त्याने बुकिंगसाठी ऍडव्हॉन्स ऑनलाइन रक्कम अदा करावी लागेल, असे सांगितले. विद्यार्थिनीने लगेच त्यासाठी "एटीएम'द्वारे पेमेंट करण्यासाठी "ओटीपी' क्रमांक सांगताच तिकीट बुक झाल्याचे त्या भामट्याने सांगून फोन ठेवला. मात्र, काही वेळातच या विद्यार्थिनीच्या मोबाईलवर बॅंक खात्यातून 19 हजार रुपये विड्रॉल करण्यात आल्याचे आढळून आले. तत्काळ जवळच जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून या विद्यार्थिनी तक्रार करीत असतानाच पुन्हा त्याच खात्यातून रक्कम विड्रॉल झाल्याचा दुसरा मेसेज आला 24 हजार रुपयांची रक्कम या भामट्याने काढून घेतल्याने या विद्यार्थिनी गांगरून गेल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बॅंकेला खाते ब्लॉक करण्याबाबत सांगितले. 

बॅंकेशी संपर्क होईना 
या विद्यार्थिनीचे खाते स्टेट बॅंकेच्या स्वातंत्र्य चौक शाखेत आहे. तेथील दूरध्वनी क्रमांकावर संपर्कासाठी प्रयत्न केला; मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर "एटीएम'वरील टोल फ्री क्रमांकावर कॉल केला. मात्र, तेथेही निराशा हाती आल्याने या दोघा मुलींनी बॅंकेच्या शाखेकडे धाव घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty four thousand rupees stolen from the student's account