गोदावरी पात्रात बुडून दोन भावांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

पिंपळस रामाचे (ता. निफाड) येथे गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाच्या बहिणीच्या हळदीच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

निफाड (जि. नाशिक) - पिंपळस रामाचे (ता. निफाड) येथे गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाच्या बहिणीच्या हळदीच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

श्रीरामनगर (कोळवाडी) येथील हर्षद ठकाजी (नीलेश) गुंजाळ (वय 15) हा त्याचा आतेभाऊ श्‍याम बाळासाहेब सुरवाडे (वय 23, रा. पिंपळस रामाचे) यांच्याकडे आलेला होता. रविवारी (ता. 19) दुपारी चारच्या सुमारास दोघे स्मशानभूमीच्या मागे असलेल्या गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने शोधाशोध केली असता, नदीकाठी दोघांचे कपडे आढळले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. आज सकाळी अकराच्या सुमारास हर्षद गुंजाळ याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. दुपारी चारच्या सुमारास श्‍यामचा मृतदेह सापडला. श्‍यामच्या बहिणीचा उद्या विवाह होता. त्यासाठी घरात सर्व जवळचे नातेवाईक जमलेले होते. लग्नाच्या तयारीची लगबग सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Brothers Drown in Godavari River Death