बाह्मणेत भिंत कोसळून दोन चिमुरड्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

बाह्मणे (ता. अमळनेर) येथे पावसामुळे मातीची भिंत शेजारी पत्र्याच्या शेडवर पडल्याने दोन चिमुरड्यांचा दबून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ३१) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. या घटनेने पावरा कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.

अमळनेर - बाह्मणे (ता. अमळनेर) येथे पावसामुळे मातीची भिंत शेजारी पत्र्याच्या शेडवर पडल्याने दोन चिमुरड्यांचा दबून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ३१) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. या घटनेने पावरा कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे. 

बाह्मणे येथील शेतमजूर पूना सदा पावरा हे पत्नी शांताबाई पावरा तसेच मुले जितेश व राहुल यांच्यासह पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. गेल्या दोन दिवसांपासून रिपरिप पाऊस सुरू असल्याने काल मध्यरात्री एकच्या सुमारास शेजारील घराची मातीची भिंत त्यांच्या पत्र्यावर कोसळली. यात संपूर्ण कुटुंब दाबले गेले. ग्रामस्थांना आरडाओरड ऐकू आल्यानंतर धर्मराज पाटील, महेश पाटील, राजेंद्र पाटील, सरपंच प्रवीण पाटील, नितीन पाटील, संतोष पाटील, गुणवंत पाटील, प्रतीक पाटील, प्रकाश पाटील, नवल पाटील, किशोर पाटील यांनी धाव घेतली. पूना पावरा व शांताबाई पावरा यांना काढण्यात त्यांना यश आले.

मात्र, जितेश व राहुल या चिमुरड्यांचा मातीच्या ढिगाऱ्यात दबल्याने मृत्यू झाला. त्यांना प्रथम बेटावद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथे सुविधा नसल्याने जखमींना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दोन्ही मुलांचे विच्छेदनही ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून मारवड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Child Death by Wall Collapse