उत्तर महाराष्ट्रात दोन दिवसांत उष्णतेची लाट! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

धुळे - उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत येत्या दोन दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आता जिल्हा प्रशासनानेही केले आहे. 

धुळे - उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत येत्या दोन दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आता जिल्हा प्रशासनानेही केले आहे. 

जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून 40 अंशांवर स्थिर असलेले तापमान काल (ता. 28) थेट 43.4 अंशांवर पोहोचले होते. आजही तापमान 43.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. यामुळे मार्चमध्येच तापमानाने 44 अंशांपर्यंत मजल मारली आहे. गेल्या सात वर्षांत प्रथमच मार्चमध्ये उच्चांकी तापमान वाढले आहे. यातच हवामान विभागानुसार जिल्हा प्रशासनाने येत्या दोन दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. 

या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तुकाराम हुलवळे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी विविध उपाययोजना कराव्यात. या कालावधीत जिल्हा नियंत्रण कक्ष, महापालिका नियंत्रण कक्ष, विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभागाने समन्वयाने कार्य करावे, सर्व संबंधित विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनीही या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही केले. 

या करा उपाययोजना..! 
या दिवसांत जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी डोक्‍यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी तयार केलेली लस्सी, तोरणी, लिंबू- पाणी, ताक आदींचा आहारात नियमित वापर करावा, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम, आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत, चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, जनावरे छावणीत बांधावीत, तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा, रात्री खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात, पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे, पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा, बाहेर कामकाज करताना मध्ये- मध्ये थांबून नियमित आराम करावा, गर्भवती कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी, रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणासाठी शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा करावी. 

Web Title: Two days of intense heat wave in North Maharashtra!