शौचालयाच्या टाकीत पडल्याने दोघांचा गुदमरून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

तालुक्यातील कैलासनगर येथे असलेल्या वेकोलीच्या वसाहतीतील शौचालयाची जाम झालेली टाकी साफ करण्याकरिता उतरलेल्या यनक येथील दोघांचा मृत्यू झाला.

वणी : तालुक्यातील कैलासनगर येथे असलेल्या वेकोलीच्या वसाहतीतील शौचालयाची जाम झालेली टाकी साफ करण्याकरिता उतरलेल्या यनक येथील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेसाठी वेकोलीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. 

वणी परिसरात अनेक कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेकोलीने सदनिका बांधल्या आहेत. शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मुगोली कोळसा खाणीची कैलासनगर येथे वसाहत आहे. या वसाहतीतील दोन शौचालयाचे टाके जाम झाल्याने वेकोली प्रशासनाने कंत्राटदारामार्फत त्याची साफ सफाई करण्याकरिता यनक या गावातील मारोती वाघमारे वय 27 व हनुमान कोडपे,वय 23 या दोन मजुरांना दि 21 मेला सकाळी दहा वाजता उतरले. मात्र, टाक्यात उतरल्यावर टाक्यातील विषारी गॅसने गुदमरून मृत्यू झाला. दिवसभर याची साधी कल्पना कोणाला नव्हती.

सायंकाळी वसाहतीतील मुले खेळत असताना त्यांचा चेंडू टाकीजवळ गेल्याने हे दोघे मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याची माहिती वसाहतीत पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, वेकोलीच्या कोणताही अधिकारी व ठेकेदार तिथे उपस्थित नव्हता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Died due to Collapsed in Toilet Tank