नाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

दिंडोरी / सायखेडा : कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज (ता.19) घडली आहे.

दिंडोरी / सायखेडा : कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज (ता.19) घडली आहे.
       अवनखेड (ता. दिंडोरी) येथील रामनाथ पोपट जाधव (वय 50) या शेतकऱ्याने बुधवारी (ता.19) पहाटे साडेपाच वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर बॅंकेचे (बॅंकेचे नाव समजू शकले नाही) अंदाजे दहा लाखांचे कर्ज होते. कालच बॅंकेने कर्ज भरण्याची नोटीस दिली होती. आज सकाळी लवकर उठून त्यांनी घराजवळच शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाला दोराचा गळफास बांधून आपली जीवनयात्रा संपवली. सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
       दुसऱ्या घटनेत सायखेडा (ता.निफाड) येथील शेतकरी राजेंद्र गोविंद कुटे (वय 55) यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार आज (ता.19) दुपारी दोन वाजेनंतर ते घराबाहेर पडले. दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी सायखेडा गोदातीराजवळ स्मशानभूमीच्या आवारात असलेल्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती कुटुंबियांना समजली.
       श्री कुटे यांच्यावर सायखेडा विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज व बाहेरील हातउसनवारीचे पैसे होते. कर्ज फेडण्यास अडचणी येत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सायखेडा पोलिस ठाण्याचे हवालदार सोमनाथ पेखळे व विशाल पैठणकर हे घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थऴाचा पंचानामा करीत मृतदेह विच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविला. कुटे यांच्या पश्‍चात पत्नी शकुंतला, मुलगी रुपाली दत्तात्रय दराडे व मुलगा विशाल असा परिवार आहे.

39 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
जिल्ह्यात जानेवारी ते 18 जून अखेर 39 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासन दप्तरी झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 104 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two farmers suicides in Nashik district