अंदाजपत्रकात अडीचशे कोटींची तूट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नाशिक - दिवसागणिक महापालिकेचा महसुली व भांडवली खर्च वाढत असल्याने उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात सुमारे अडीचशे कोटींची तूट राहण्याची शक्‍यता असून, आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकातही घट होऊन अकराशे कोटींवर अंदाजपत्रक स्थिर राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. आचारसंहिता सुरू झाल्यानंतर तात्पुरता खर्च भागविण्यासाठी लेखानुदानावर अवलंबून राहावे लागणार आहे. 

यंदाच्या आर्थिक वर्षाचे 1358 कोटींचे अंदाजपत्रक प्रशासनाने सादर केले होते. स्थायी समितीने त्यात 380 कोटींच्या अतिरिक्त कामांची वाढ करत 1738 कोटींचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले. महासभेने 23 कोटी 51 लाखांची किंचित वाढ करून प्रशासनाला एक हजार 761 कोटी 51 लाखांचे अंतिम अंदाजपत्रक मंजूर केले. प्रशासनाच्या हाती सहा महिने विलंबाने अंदाजपत्रक पडले. त्यामुळे योजना अमलात आणताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. पुढील महिन्यात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, त्यानंतर महापालिकेची निवडणूक होणार असल्याने आचारसंहिता लागू होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या लेखा विभागाने महसुली जमेचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. त्यातून अंदाजपत्रक अकराशे कोटींवर स्थिर राहण्याची शक्‍यता असून, प्रशासनाच्या अंदाजपत्रकाला कात्री लागण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Two hundred fifty crore deficit budget