हिम्मत बघा चोरांची...चक्क 'इतक्या' रकमेच्या सोनसाखळ्या लांबविल्या 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

गंगापूर हद्दीतील बारदान फाटा येथे सकाळी नऊच्या सुमारास ज्योती अहिरे (रा. अष्टविनायक अपार्टमेंट, शिवाजीनगर, सातपूर) बाहेरगावी जाण्यासाठी गंगापूर रोडवरील बारदान फाटा येथील रिक्षा थांबा येथे आल्या. रिक्षाची प्रतीक्षा करीत असतानाच, काळ्या रंगाच्या पल्सरवरून दोन हेल्मेटधारी संशयित त्यांच्या समोर अचानक आले आणि अहिरे यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची एक लाख 80 हजारांची सोन्याची पोत ओढून पोबारा केला.

नाशिक : शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, बुधवारी (ता. १३) सकाळी तास-दीड तासात दोन घटनांमध्ये दोन लाख ३० हजारांच्या सोन्याच्या पोत हिसकावून नेल्या. यात एक किराणा दुकानदार महिला, तर दुसरी शिक्षिका आहे. याप्रकरणी गंगापूर, आडगाव पोलिसांत चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले. घटनेनंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात संशयित यशस्वी झाले. 

गंगापूर, आडगाव परिसरातील घटना 
गंगापूर हद्दीतील बारदान फाटा येथे सकाळी नऊच्या सुमारास ज्योती अहिरे (रा. अष्टविनायक अपार्टमेंट, शिवाजीनगर, सातपूर) बाहेरगावी जाण्यासाठी गंगापूर रोडवरील बारदान फाटा येथील रिक्षा थांबा येथे आल्या. रिक्षाची प्रतीक्षा करीत असतानाच, काळ्या रंगाच्या पल्सरवरून दोन हेल्मेटधारी संशयित त्यांच्या समोर अचानक आले आणि अहिरे यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची एक लाख 80 हजारांची सोन्याची पोत ओढून पोबारा केला. दुसऱ्या घटनेत शांता दिवाण (रा. विडी कामगारनगरजवळ, अमृतधाम) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे धनश्री प्रोव्हिजन किराणा दुकान आहे. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान उघडले आणि गिऱ्हाइकांना सामान विक्री करीत होते. सव्वा दहाच्या सुमारास त्यांच्या दुकानासमोर पल्सरवरून दोन हेल्मेटधारी आले. यातील एकाने दुकानात येऊन चॉकलेट, चिप्स खरेदी केल्यानंतर संशयिताने पैसेही दिले. श्रीमती दिवाण यांनी उर्वरित पैसे दिल्यानंतर संशयिताने संधी साधून त्यांच्या गळ्यातील 50 हजारांची दोन तोळ्याची सोन्याची पोत ओढली. त्यावेळी सावध झालेल्या शांता दिवाण यांनी गळ्यातील पोत धरली. यात अर्धी पोत ओढून संशयिताने साथीदारासह दुचाकीवरून पोबारा केला. 

नाकाबंदीनंतरही अपयश 
सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्यानंतर शहरात तत्काळ नाकाबंदी करण्यात आली. परंतु दिवसभराच्या नाकाबंदीनंतरही संशयित पोलिसांच्या हाती तुरी देण्यास यशस्वी झाले आहेत. रात्रीपर्यंत संशयितांचा कोणताही मागमूस लागला नाही. सोनसाखळी चोरटे शहरातील असण्याची दाट शक्‍यता व्यक्त केली जात आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two lakhs Gold chains extended at Nashik