डाळींचे भाव दोन महिन्यांत निम्म्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

यंदा चांगला पाऊस झाल्याने धान्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे डाळ उद्योगासाठी लागणारा कच्चा माल स्वस्त व चांगल्या दर्जाचा मिळत आहे. त्यावर प्रक्रिया करणे सोपे जात असल्याने डाळींचे भाव कमी झाले आहेत. आणखी काही महिने ही आदर्श स्थिती राहिली तर जे डाळ उद्योग बंद पडले आहेत, ते सुरू होतील. 
- प्रेम कोगटा (अध्यक्ष, दालमिल ओनर्स असोसिएशन) 

जळगाव - गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा वाढलेले कडधान्याचे उत्पादन, आयात होणाऱ्या डाळींचे योग्य भाव यामुळे गेल्या दोन महिन्यांत डाळींचे भाव निम्म्यावर आले आहेत. विशेष म्हणजे तूर व उडीदडाळीच्या भावाने वर्ष-दीड वर्षापूर्वी दोनशेचा पल्ला गाठला होता, या डाळींचे भावही शंभरीच्या खाली उतरले आहेत. कडधान्य उत्पादनवाढीचा परिणाम जळगावातील प्रसिद्ध डाळ उद्योगावरही झाला असून, या उद्योगांतील उत्पादनही 20 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. 

गेल्या दीड-दोन वर्षांत सर्वच प्रकारच्या डाळींनी सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यांत अक्षरश: पाणी आणले होते. रोजच्या जेवणातील तूरडाळ किलोमागे दोनशे रुपयांपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना "वरणभात' खाणेही मुश्‍कील झाले होते. गेल्या दोन-तीन वर्षांतील दुष्काळी स्थिती, साठेबाजीमुळे हे भाव वाढल्याची कारणे आतापर्यंत सांगितली जात होती. आज मात्र स्थिती बदलली आहे. 

दोन वर्षांतील नीचांक 
गेल्या आठवडा-पंधरवड्यात सर्व प्रकारच्या डाळींचे भाव निम्म्यावर आले आहेत. एकट्या तूरडाळीचे उदाहरण लक्षात घेतल्यास साधारण दिवाळीपूर्वी 150 रुपये किलो असलेली तूरडाळ आज 80 रुपये किलोने बाजारात उपलब्ध आहे. मूग, उडीद आणि चणाडाळीचे भावही निम्म्याने घटले आहेत. 

आयात चांगली, उत्पादनवाढीचा परिणाम 
दरम्यान, डाळींचे भाव कमी होण्यामागे दोन-तीन कारणे आहेत. एकतर गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पाऊस चांगला झालेला असल्याने सर्वच धान्याचे उत्पादन वाढले आहे. त्यातही कडधान्याच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कच्चा माल स्वस्त उपलब्ध होत आहे. तसेच आयात होणाऱ्या डाळींचे भावही यंदा अत्यंत माफक आहेत. त्यामुळे याचा एकूण परिणाम डाळींचे भाव घटण्यावर झाला आहे. 

डाळ उद्योगही तेजीत 
जळगाव जिल्ह्यातील डाळ उद्योग देशभरात प्रसिद्ध आहे. जळगावातून देशात आणि विदेशातही डाळींची निर्यात होते. जळगावात डाळींवर प्रक्रिया करणारे जवळपास 70 उद्योग कार्यान्वित आहेत. यातून दररोज पाच ते सहा हजार टन उत्पादन होते. आता या उत्पादनात जवळपास 20 टक्के वाढ झाली आहे. 

असे आहेत डाळींचे दर 
प्रकार ---- होलसेल (आजचे भाव)-------- किरकोळ (आजचे भाव)------ दोन महिन्यांपूर्वीचे भाव (होलसेल, किरकोळ) 
तूर -------74 ते 80------80 ते 85------ 140 ते 150 
मूग ------60 ते 65-------70 ते 75------ 90 ते 100 
उडीद -----80 ते 85------ 90 ते 95------- 140 ते 150 
चणाडाळ---85 ते 90-------90 ते 95 -----125 ते 135 

यंदा धान्याचे उत्पादन चांगले झाल्यामुळे सर्व प्रकारच्या डाळींचे भाव कमी झाले आहेत. सध्या मागणीही कमी आहे. येत्या महिना-दोन महिन्यांत मागणी वाढल्यानंतर या भावात थोडीशी वाढ होईल. मात्र, अन्य ठिकाणांहून मालाची आवक होणार असल्याने डाळींचे भाव खूप जास्त वाढणार नाहीत. 
- प्रवीण पगारिया (व्यापारी, होलसेल धान्य)

Web Title: Two months on half pulses