कालव्यात बुडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

प्रमोद सावंत
शनिवार, 24 मार्च 2018

नेहा व भूमी पाण्यात बुडून काही अंतरापर्यंत वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तरुणांनी तातडीने त्यांनाही बाहेर काढले. दोघींना कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

मालेगाव : देवघट (ता.मालेगाव) शिवारातील पांझण डाव्या पाट कालव्यात आई समवेत धुणी-भांडीसाठी गेलेल्या तीन चिमुकल्या कालव्यात वाहून गेल्या. नेहा संतोष अहिरे (१०) व भूमी संतोष अहिरे (६) या सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. ही घटना समजल्यानंतर देवघट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शालेय शिक्षण घेणाऱ्या या तिघी बहिणी आई आशाबाईसोबत धुणीभांडी घासण्यासाठी पाटकालव्यावर गेल्या होत्या. शनिवार शाळेचा अर्धा दिवस असल्याने मुली पाटकिनारी धुणीभांडी करीत खेळत असताना नेहा, भूमी या दोघी बहिणी व त्यांची चुलत बहीण खुशी या तिघी पाय घसरल्याने कालव्यात पडल्या. या घटनेनंतर आजूबाजूच्या महिलांनी आरडाओरड केली. त्यांचा आरडाओरड ऐकून रस्त्याने जाणाऱ्या मासेमारी करणाऱ्या तरुणासह अनेकांनी पाण्यात उडी घेतली. खुशी नजीकच असल्याने सुरेश भोई (रा. सायगाव, ता.चाळीसगाव) या मासेमारी करणाऱ्या तरुणाने तिला वाचविले.

नेहा व भूमी पाण्यात बुडून काही अंतरापर्यंत वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तरुणांनी तातडीने त्यांनाही बाहेर काढले. दोघींना कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सायंकाळी शवविच्छेदनासाठी येथील सामान्य रुग्णालयात त्यांचे मृतदेह आणण्यात आले. या मुली कालव्यात पडल्या तेव्हा तिघींचे हात एकमेकांच्या हातात होते. मात्र, त्यांची साथ सुटली. दोघींचा मृत्यू झाला. एकीचे प्राण वाचले, असे ग्रामस्थांनी सांगितले. 

बहिणींच्या मृत्यूने खुशी सुन्न झाली. तिला काही सुचेनासे झाले. घटनेचे वृत्त समजताच तालुका पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळ दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली.

संतोष अहिरे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मुलींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासह कुटंबीयांच्या रडण्याला पारावार नव्हता. नेहा चौथीला तर भूमी मोठ्या गटात अभिनव इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेत होत्या. त्यांची बहिण खुशी दुसरीला देवघट येथील प्राथमिक शाळेत होती. शेती व मोलमजुरी करणाऱ्या अहिरे कुटुंबातील दोघा मुलींचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: Two Real sisters have been Dead in water