सैन्यातील दोघा जवानांचा "एसपी' कार्यालयात धिंगाणा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

जळगाव -  वर्षभरापासून पत्नीशी सुरू असलेल्या वादात महिला दक्षता समितीत समुपदेशनासाठी बोलावण्यात आल्यावर सेनेत जवान पतीने पत्नीला शिवीगाळ करून महिला पोलिसांशी असभ्य वर्तन केले. अधिकाऱ्यांसमक्ष हजर करताच उपअधीक्षकासह गुन्हे शाखा निरीक्षकांशीही अरेरावी करीत हुज्जत घातली. एवढेच नव्हे तर भिंतीला डोके आपटून, गुन्हे शाखेच्या गाडीच्या काचा फोडून नुकसान केल्याची गंभीर घटना आज घडली. या प्रकरणी दोन्ही जवानांसह तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव -  वर्षभरापासून पत्नीशी सुरू असलेल्या वादात महिला दक्षता समितीत समुपदेशनासाठी बोलावण्यात आल्यावर सेनेत जवान पतीने पत्नीला शिवीगाळ करून महिला पोलिसांशी असभ्य वर्तन केले. अधिकाऱ्यांसमक्ष हजर करताच उपअधीक्षकासह गुन्हे शाखा निरीक्षकांशीही अरेरावी करीत हुज्जत घातली. एवढेच नव्हे तर भिंतीला डोके आपटून, गुन्हे शाखेच्या गाडीच्या काचा फोडून नुकसान केल्याची गंभीर घटना आज घडली. या प्रकरणी दोन्ही जवानांसह तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पांढरद (ता. भडगाव) येथील मूळ रहिवासी तथा इंडोतिबेटीयन फोर्सचा (आयटीबीपी) जवान प्रमोद दगा पाटील याचा पत्नी गायत्रीशी गेल्या वर्षभरापासून वाद सुरू आहे. पाचोरा तालुक्‍यातील नेरी वडगाव माहेर असलेल्या गायत्रीशी पाच वर्षांपूर्वीच प्रमोदचा विवाह झाला होता. त्यांना तनुजा (वय 4 वर्षे) मुलगी आहे. लग्नापासूनच तो पत्नीला त्रास देत असल्याची तक्रार गायत्रीने महिला दक्षता समितीकडे केली होती. त्यात नमूद केल्याप्रमाणे 27 डिसेंबर 2015 ला त्याने पत्नी गायत्री व मुलीला घराबाहेर काढले आणि नोकरीच्या ठिकाणी भटिंडा कॅम्पमध्ये निघून गेला. तेव्हापासून गायत्री वडील साहेबराव शिवराम पाटील यांच्याकडेच (माहेरी) होत्या. दक्षता समितीने चार वेळा समन्स बजावल्यावर त्याने फोनवर आपण सहा महिन्यांनंतर सुटीवर आल्यावर हजर होऊ, असे त्याने दक्षता समितीच्या महिला पोलिसांना सांगितले. त्यानुसार तो आज हजर झाला. 

महिला पोलिसांना धमकी 
काही दिवसांपूर्वी प्रमोद गावाला आल्यानंतर त्याने महिला सहाय्य कक्षाच्या सविता परदेशी यांना कळविले. त्यानुसार आज दुपारी 3.15 च्या सुमारास प्रमोद पाटील सोबत नॅशनल डिझास्टर रेस्क्‍यू फोर्स (एनडीआरफ)मध्ये कार्यरत भाऊ समाधान, एसटी महामंडळातील कर्मचारी भाऊ निंबा, भाचा विनोद रवींद्र पाटील आदींसह महिला दक्षता समितीत आला. यावेळी महिला पोलिस कर्मचारी सविता परदेशी बोलत असताना त्याने पत्नीशी वाद घातला. "तुला यायचे असेल तर तुझी तू ये, महिला दक्षता समितीमार्फत मी नेणार नाही' असे त्याने सांगितले. त्यावर मध्यस्थी करणाऱ्या महिला पोलिसांशी वाद घालत खोट्या तक्रारीची धमकी त्याने दिली. परिणामी त्यांनी पती-पत्नीला घेऊन गुन्हे शाखेत वरिष्ठ निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्यापुढे हजर केले. श्री. चंदेल यांच्याशीही दोघा भावांनी हुज्जत घालत अरेरावी केली. प्रकरण जिल्हापेठ पोलिसांत पाठवत असतानाच प्रमोदने भिंतीला डोके आपटून घेत गोंधळ घातला. डीवायएसपी सचिन सांगळे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता दोघा भावांनी त्यांच्याशीही अरेरावी केली. नाइलाजास्तव त्यांना ताब्यात घेत असताना दोघांनी गुन्हे शाखेच्या शासकीय वाहनाला लाथा मारून जीपचे मागील काच फोडले. 

आता.. मी, अशी गावी जाऊ 
गायत्री पाटील यांच्यासमवेत चार वर्षांची मुलगी होती. घडला प्रकार पाहून मुलगी व आई दोघेही भेदरलेल्या अवस्थेत होत्या. जर गावी गेली तर ते सोडणार नाहीत. लहान भाऊ व कुटुंबीयांना मारहाण करतील, अशा विवंचनेत बसलेल्या गायत्रीला महिला पोलिस अधिकाऱ्यांनी धीर देत कुटुंबीयांना बोलावून घेत परत घरी जाण्यास सांगण्यात आले. 

घडला प्रकार अंत्यत गंभीर आहे, महिला पोलिसांशी असभ्य वर्तन, शासकीय कामात हस्तक्षेप आणि शासकीय वाहनाचे नुकसान केल्या प्रकरणाची माहिती संबंधितांच्या कमांडिंग ऑफिसरला, वायरलेस मेसेजद्वारे कळविण्यात आली आहे. घडल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
- सचिन सांगळे, उपअधीक्षक, जळगाव भाग 

पती-पत्नीचा संसार पूर्ववत व्हावा, हा उद्देश म्हणून त्यांना माझ्या कक्षात बोलावले. त्याची पत्नी व सासरे यांच्यासमक्ष चर्चा करतानाच तो वाद घालू लागला. त्याच्या भावाला बोलावून सांगितले, तरीही त्याने ऐकले नाही. जाताना लाकडी दारावर डोके आपटून घेत फोडून घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दोघा भावांनी हुज्जत घातली. 
- राजेशसिंह चंदेल, निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा 

पहिलवानांचे पोलिस ठाणे संकटकाळी रिकामेच 
"आरसीपी'च्या दहा कर्मचाऱ्यांकडून सेनेचे हे दोघे जवान आवरता येत नव्हते. एरवी जिल्हा, राज्यस्तरीय पहेलवानी स्पर्धा गाजविणारे, बलदंड शरीराचे खास कर्मचारी आणि डीबी पथक, प्रभारी अधिकारी दुय्यम अधिकारी पोलिस ठाण्यात गैरहजर होते. रुग्णालयात पाठवायला पोलिस ठाण्याच्या गाडीवर चालक नाही, अधिकारी, कर्मचारी नसल्याचे "डीवायएसपी' सचिन सांगळे यांनीही परिस्थिती अनुभवली. संकटकाळात अधिकारी नसले तरी त्यांचे पहिलवान कर्मचारी असते, तर किमान त्यांना पाहून दोघा सेना जवानांनी नमते घेतले असते, असेही यावेळी हजर अनुभवी कर्मचारी बोलून गेले. 

सेनेत म्हणूनच...आदर ! 
जम्मू-काश्‍मीरमध्ये सेना मुख्यालयावर हल्ला होऊन 19 जवान शहीद झाले, तेव्हा संपूर्ण देश अश्रूंत भिजला. सर्वत्र संताप होत असताना पाकव्याप्त काश्‍मीरमधील "सर्जिकल स्ट्राईक'ने भारतीयांची मान उंचावली, म्हणूनच सर्वत्र सेनेच्या जवानांकडे देश आदराने बघतो. आज दोघेही सेना जवान सख्खे भाऊ अधीक्षक कार्यालयात असताना त्यांनाही तो मान मिळाला. मात्र, संतापात त्यांनी या सन्मानाची माती केली. त्यांनी केलेल्या प्रकाराने गुन्हा दाखल होऊन गजाआड व्हावे लागले. 

पत्नीचीही तक्रार 
पत्नी गायत्रीने तक्रार करताना गुवाहाटी येथे आपल्यावर रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न झाला होता, अगोदरची मुलगी आणि भडगाव येथे एका डॉक्‍टरकडे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचेही तिने सांगितले. घडला प्रकार भडगाव येथील असल्याने तिच्या पालकांनी भडगाव पोलिसांत तक्रार देण्याची तयारी दर्शविली आहे. 

Web Title: The two solider razzle in the Sp office