एकाच आसन क्रमांकावर दाखविले दोन विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

पुणे विद्यापीठाचा प्रताप; विधी शाखेचे विद्यार्थी संतप्त

पुणे विद्यापीठाचा प्रताप; विधी शाखेचे विद्यार्थी संतप्त
नाशिक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर केला आहे. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट दिली असता, "रिझल्ट नॉट फाउंड' असा शेरा लिहून येत आहे; तर एकाच आसन क्रमांकावर दोन विद्यार्थ्यांचा निकाल दिसत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठाच्या या प्रतापामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

पुणे विद्यापीठांतर्गत बीएसएल, एलएलबी या अभ्यासक्रमांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. निकालाशी समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठाकडे अर्ज केले होते. त्यानुसार पुनर्मूल्यांकनाचा निकाल विद्यापीठातर्फे ऑनलाइन स्वरूपात जाहीर करण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट दिली असता, "रेकॉर्ड नॉट फाउंड', "रिझल्ट नॉट फाउंड' असा संदेश संकेतस्थळावर दाखविण्यात आला. त्या पलीकडे जाऊन एकाच आसन क्रमांकावर दोन विद्यार्थ्यांची नावे दर्शविण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

दरम्यान, घडलेल्या या प्रकारासंदर्भात विद्यापीठाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. मात्र, त्यांना विद्यापीठातर्फे कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संतापात आणखीच भर पडली. घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ असून, विद्यापीठाने तातडीने मार्ग काढावा; अन्यथा आंदोलन पुकारण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांतर्फे देण्यात आला.

Web Title: Two students showed the same seat number