Raksha Bandhan 2019 : पोलिसांना राख्या बांधून विद्यार्थिनींनी केली राखीपौर्णिमा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

आज मंगळवारी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलमधील चिमुकल्या विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष सटाणा पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षक वासुदेव देसले आणि इतर कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला.

सटाणा : बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र सदैव ‘ऑन ड्युटी’ असलेल्या सैन्य दलातील जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरा करता येत नाही. आज मंगळवारी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलमधील चिमुकल्या विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष सटाणा पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षक वासुदेव देसले आणि इतर कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला. देसले यांनी देखील ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले. 

आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा - सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे शक्य होत नाही. अनेक सणवार त्यांना कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक पोलिस गावाकडे असलेल्या बहिणीला भेटून सण साजरा करू शकत नाहीत, त्यामुळे यंदा हा सण पोलिसांसोबत साजरा करावा, अशी संकल्पना जिजामाता विद्यालयाच्या प्राचार्या एस. बी. मराठे यांनी मांडली.

आज दुपारी दोन वाजता प्राचार्या मराठे यांनी विद्यार्थिनी आणि शिक्षिकांसह पोलिस ठाणे गाठले. यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलिस निरीक्षक वासुदेव देसले तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बांधल्या. रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करण्याऱ्या वाहतूक पोलिसांना देखील राखी बांधून ओवाळले. चिमुकल्या विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने सर्वच पोलिस कर्मचारी आणि अधिकारी भारावले होते. पोलिस निरीक्षक देसले यांनी सर्व विद्यार्थिनींना पेन भेट देऊन खाऊ वाटप केला. शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

यावेळी पोलिस नाईक नवनाथ पवार, अजय महाजन, योगेंद्र शिसोदे, पंकज सोनवणे, निवृत्ती भोये, रविंद्र कोकणी, विलास मोरे, पुंडलिक डंबाळे, योगेश गुंजाळ पोलिस कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: By tying rakhi to policemen students celebrate rakshabandhan