शेतकऱ्यांसाठी प्रसंगी सत्ता सोडू : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

विरोधी पक्षात असताना फडणवीस यांची भाषा कर्जमुक्‍तीच्या बाजूने होती, मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांची भाषा बदलली आहे. त्यांना शेतकऱ्यांची काळजी नाही, तर सरकार पडेल याची काळजी आहे

नाशिक : कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची कर्जमुक्‍ती झालीच पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे. यासाठी शिवसेना विधानभवनावर लॉंग मार्च काढेल. प्रसंगी सत्ता सोडण्याची तयारी आहे, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेने च्यावतीने आयोजित कृषी अधिवेशनात ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवत ठाकरे म्हणाले,"विरोधी पक्षात असताना फडणवीस यांची भाषा कर्जमुक्‍तीच्या बाजूने होती, मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांची भाषा बदलली आहे. त्यांना शेतकऱ्यांची काळजी नाही, तर सरकार पडेल याची काळजी आहे. त्यांनी कर्जमुक्‍ती केली तर त्यांना बाहेरून पाठिंबा द्यायची आमची तयारी आहे."' 

"सध्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी लढाई लागेल. ती लढाई आम्ही लढणार आहोत. शेतकऱ्यांनी आता रडायचं नाही, फक्‍त लढायचं, ही भूमिका घ्यावी. साले बोलणाऱ्यांना आता रडवायचं आहे. शिवसेना याप्रश्‍नी अभियान राबवेल, तसेच विधानभवनावर लॉंग मार्च काढेल. मी स्वतः: राज्यभर फिरून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे,'' असे ठाकरे म्हणाले. 

Web Title: Uddhav Thackeray criticizes Government