अहमदाबाद दौऱ्याबाबत अनिश्‍चितता

अहमदाबाद दौऱ्याबाबत अनिश्‍चितता

नाशिक - तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर अहमदाबाद येथे हरितक्षेत्र विकासाच्या पाहणीसाठी आयोजित करण्यात आलेला दौरा अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा दौरा यशस्वीपणे व्हावा यासाठी स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी संचालकांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

स्मार्टसिटीअंतर्गत हरितक्षेत्र विकसित करण्यासाठी मखमलाबाद व रामवाडी येथील साडेसातशे एकर जागेची निवड करण्यात आली आहे. पण स्थानिक शेतकऱ्यांचा जागा देण्यास तीव्र विरोध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हा विषय गेल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची मने वळविण्याचा सल्ला देताना अहमदाबादचा प्रकल्प दाखविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तशी तयारी केली. नोव्हेंबरच्या सुरवातीला दौरा निश्‍चित करण्यात आला होता, पण दिवाळीचे कारण देत संचालकांनी विरोध केला. निमित्त दिवाळीचे असले, तरी प्रत्यक्षात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना विरोध करण्याचाच होता. मुंढे यांनी जो येईल त्याला बरोबर घेऊन जाण्याचा सल्ला स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन २९ व ३० नोव्हेंबरला दौऱ्याचे नियोजन करण्यात आले.

दौरा यशस्वी करण्याची तयारी
परस्पर दौरा ठरविण्यात आल्याने संचालकांनी नाराजी उघड करत नोव्हेंबरअखेरच्या दौऱ्यात जाण्यास नकार दिला. एकीकडे कंपनीचे अधिकारी दौऱ्यावर ठाम राहिले. दुसरीकडे, संचालकांचा विरोध राहिला. गेल्या आठवड्यात मुंढे यांची बदली झाल्याने स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची दौरा यशस्वी करण्याची मानसिकता ढासळली आहे. संचालकांशी चर्चा करून दौरा यशस्वी करू, असा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात संचालकच उपलब्ध होत नसल्याने हरितक्षेत्र विकासाचा दौरा अनिश्‍चिततेच्या गर्तेत सापडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com