नाशिककरांनो! अशोक स्तंभ चौकातून प्रवास करताय..मग ही महत्वाची बातमी..

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

स्मार्टसिटी प्रकल्पात नाशिक शहराचा समावेश करण्यात आला. त्याअंतर्गत गेल्या दीड वर्षांपासून त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या स्मार्ट रोडचे काम सुरू आहे. अद्यापही हा रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. मेहेर सिग्नल वाहतुकीला खुला झाला असताना सीबीएस सिग्नल अद्याप सुरू झालेला नाही. तर गेल्या चार दिवसांपासून या मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू केली आहे. अशोक स्तंभ या चौकाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यासाठीची अधिसूचना वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आली. 

नाशिक : स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या स्मार्ट रोडचे काम प्रगतिपथावर असतानाच आता अशोक स्तंभ चौकाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अशोक स्तंभ चौक शुक्रवार (ता. 22)पासून सर्वप्रकाराच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. तशी अधिसूचना शहर पोलिस वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी जारी केली. 

स्मार्ट रोडअंतर्गत चौकाचे काम, वाहतूक मार्गात बदल

स्मार्टसिटी प्रकल्पात नाशिक शहराचा समावेश करण्यात आला. त्याअंतर्गत गेल्या दीड वर्षांपासून त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या स्मार्ट रोडचे काम सुरू आहे. अद्यापही हा रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. मेहेर सिग्नल वाहतुकीला खुला झाला असताना सीबीएस सिग्नल अद्याप सुरू झालेला नाही. तर गेल्या चार दिवसांपासून या मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू केली आहे. अशोक स्तंभ या चौकाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यासाठीची अधिसूचना वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आली. 

अशी वळविली वाहतूक 
- सीबीएस, मेहेर चौकाकडून अशोक स्तंभाकडे जाणाऱ्या वाहतुकीला बंदी. 
- सीबीएसकडून अशोक स्तंभमार्गे पंचवटीकडे जाणारी वाहने मेहेर सिग्नल, सांगली बॅंक सिग्नल, रविवार कारंजामार्गे पंचवटीकडे जातील वा अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा. 
- मेहेर सिग्नलकडून वकीलवाडीमार्गे रविवार कारंजाकडे जाता येईल. 
- सीबीएसकडून अशोक स्तंभमार्गे रविवार कारंजाकडे जाणाऱ्या शहर बस व अवजड वाहने सीबीएस सिग्नलकडून टिळकवाडी सिग्नल, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स, रामवाडीमार्गे पंचवटीकडे जातील. 
- गंगापूर रोडकडून अशोक स्तंभमार्गे रविवार कारंजा, पंचवटीकडे जाणाऱ्या वाहतुकीला बंदी. 
- गंगापूर रोडने येणारी वाहतूक पशुवैद्यकीय दवाखाना, सिद्धेश्‍वर मंदिर, रामवाडी पूल, मखमलाबाद नाका, मालेगाव स्टॅन्डमार्गे पंचवटीकडे जाईल. 
- पंचवटीकडून रामवाडीमार्गे अशोक स्तंभाकडे येणाऱ्या दुचाकी वगळता अन्य वाहनांना वाहतुकीसाठी बंदी. 
- पंचवटीकडून रामवाडी पुलामार्गे अशोक स्तंभ, गंगापूर रोडकडे येणारी वाहने बायजाबाई छावणीमार्गे, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाकामार्गे वाहतूक होईल. 
 
या मार्गावरून दुहेरी वाहतूक 
- रविवारी कारंजा ते सांगली बॅंक सिग्नल या मार्गावरून एकेरी वाहतूक होते. मात्र अशोक स्तंभ चौक बंद करण्यात येणार असल्याने संबंधित मार्ग अवजड वाहने वगळून सर्वप्रकारच्या वाहनांना दुहेरी वाहतुकीसाठी खुला असणार आहे. ही दुहेरी वाहतूक अशोक स्तंभ चौकाचे काम पूर्ण होईपर्यंत सुरू राहील. 
- अशोक स्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखाना ते रामवाडी पुलापर्यंत रस्ता हा दोन्ही बाजूने नो-पार्किंग, नो-हॉल्टिंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 
- घारपुरे घाटावर वाहन पार्किंग करता येईल.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under Smart Road project Nashik,s Ashoksthamb Chowk works starts changes in traffic