
Unseasonal Rain : न्याहली येथे बीएसएनएलचा टॉवर कोसळला; आठवडाभरात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस
न्याहली (जि. नंदुरबार) : नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील न्याहलीसह परिसरात बुधवारी (ता. १५) सायंकाळी सहाला वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस (unseasonal rain) झाला. आठवड्याभरात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. (unseasonal Heavy rain with gale force winds nandurbar news)
तसेच बीएसएनएलचा टॉवर जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांवर व व्यायामशाळेवर कोसळल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने शाळा बंद असल्यामुळे कुठलीही हानी झाली नाही. न्याहलीसह परिसरातील खोक्राळे, वैंदाणे, आसाणे, घोटाणे, कार्ली, बलदाणे, भादवड परिसरात सहाच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वादळी वारा व जोरदार पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांचा परिपक्व झालेला गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.
कापणीला आलेला गहू भुईसपाट झाला. मळणीसाठी कापून ठेवलेला हरभरा पावसात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रचंड वादळामुळे न्याहली येथील बीएसएनएलचा वायरलेस दूरध्वनीचा टॉवर कोसळला.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांचे नुकसान झाले. व्यायामशाळेच्या छतावरही टॉवर कोसळल्याने व्यायामशाळेचेही नुकसान झाले. सुदैवाने टॉवर कोसळला तेव्हा शाळा बंद होती. त्यामुळे मोठी आणि टळली.
तसेच अनेक झाडांची पडझड झाली. आठवड्याभरात सलग तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. होळीच्या दिवसापासून सुरू झालेला अवकाळी पावसाचा कहर अद्याप सुरू आहे. वादळी वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम पुरता वाया गेला आहे. रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.