Unseasonal Rain : अवकाळीचा फटका; खरिपानंतर आता रब्बीच्याही आशा धुळीस! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Storm damage to harvested sorghum.

Unseasonal Rain : अवकाळीचा फटका; खरिपानंतर आता रब्बीच्याही आशा धुळीस!

कापडणे (जि. धुळे) : धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर व साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. वादळी वारे, बोरांएवढ्या गारा व पावसाचे टपोरे थेंबांनी काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (unseasonal rain After Kharip now rabbi crop also damaged dhule news)

एखाद दुसऱ्या पावसाने नुकसान होत असते. मात्र आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने नुकसान अन नुकसानच होत आहे. मोसमी परतीच्या पावसाने खरिपाचे आता अवकाळीने रब्बीची वाताहत केली आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाला आहे. आता सरकार तरी डोळे उघडून तारेल का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

खरिपात परतीच्या पावसाने नुकसान

जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात सुरवातीला पावसाने दडी मारली. त्यानंतर सातत्यपूर्ण पाऊस झाला. दुबार पेरणी केलेली पिके चांगली तरारली. उशिराचा खरीप हंगाम भर काढणार, असे आशादायक चित्र निर्माण झाले. पिके काढणीस आली, अन परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरु झाला. पन्नास साठ टक्के येणारा खरीप हंगाम अवघा पंधरा वीस टक्के आला. झालेला खर्च आणि काढणीच्या खर्चाने शेतकरी कर्जबाजारी झाला.

रब्बीही बुडाला

परतीच्या पावसाने नुकसान केले. मात्र नदी नाले दुथडी भरून वाहिले. विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी कमालीची वाढली आहे. अद्यापही बऱ्याच भागात टिकून आहे. रब्बीचे क्षेत्र गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने वाढले आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

आता रब्बी काढणीचा हंगाम सुरू झाला. अन्‌ अवकाळीचा फटका बसत आहे. पंजाब, हरियानातील व स्थानिक हार्वेस्टर काढणीच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. पण पावसाने नुकसान झाल्याने, हार्वेस्टरने काढणी करणे कठीण झाले आहे. रब्बी बुडालाय. अन्‌ मजुरांनाही हाताला काम मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

पंचनाम्याचीही फरपट

अवकाळीचा फटका कमी अधिक प्रमाणात प्रत्येक तालुक्यातील गावांना बसत आहे. अद्यापही तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. पंचनामे काही ठिकाणी सुरु झालेत. पूर्णही झालेत. पण बऱ्याचशा भागांमध्ये महसूल आणि कृषीचे कर्मचारी पोचलेले नाहीत. पंचनाम्याची मागणी होत आहे.

रब्बीच्या नुकसानीबाबत एकरी नुकसानीची रक्कम घोषित झालेली नाही. सरसकट मदत होणार का, याबाबतही साशंकता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. रब्बीची ई पीक पाहणी लावलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळण्याची मागणी पुंडलिक पाटील, सुनील पाटील, साहेबराव पाटील, बाबूलाल पाटील आदींसह जिल्ह्याभरातून होत आहे.

संपाचा परिणाम पंचनाम्यावरही

राज्यातील कर्मचाऱ्यांनी पेन्शनसाठी संप पुकारलेला आहे. याचा परिणाम कृषी क्षेत्रावरही अधिक जाणवत आहे. अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेती शिवारात कुणीही फिरकत नसल्याची सद्य:स्थिती आहे. शासनाने वेगळ्या यंत्रणेमार्फत पंचनामे करावेत. अत्यावश्यक सेवा म्हणून पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.