
Unseasonal Rain : शहादा तालुक्यात 747 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
शहादा (जि. नंदुरबार) : शहादा तालुक्यात (ता. ६) दुपारी चारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसामुळे (Rain) रब्बी हंगामातील काही पिके भुईसपाट झाल्याने
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने शेतकरी पुरता हताश झाला आहे. (unseasonal rain damage rabi crop in shahada nandurbar news)
तालुक्यातील सुमारे ७४७ हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाल्याच्या अंदाज कृषी विभागातर्फे करण्यात आलेल्या प्राथमिक पाहणीत समोर आला आहे. नुकसानीचे पंचनामे कृषी, महसूल विभागातर्फे सुरू आहेत. दरम्यान, नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शहादा तालुक्यात होळीच्या दिवशी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यात साऱ्यांची त्रिधातिरपीट उडाली. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, दादर आदी प्रमुख कापणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
त्यात काही पिके जमिनीवर आडवी झाल्याने उत्पादन वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात काही ठिकाणी केळीचे खांब भुईसपाट झाल्याने वर्षभर लावलेला खर्च मातीमोल झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
कृषी विभागातर्फे पंचनामे सुरू
सारंगखेडा परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळ यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे महसूल, कृषी विभागामार्फत करण्यात येत आहेत. सारंगखेडा महसुली विभागातील, कुऱ्हावद, कवठळ, अनरद, पुसनद या पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, मका, बाजरी या कापणीला आलेल्या शेतमालाचे नुकसान झाले आहे.
अचानक व अवकाळी आलेला पाऊस, वादळ यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर महसूल, कृषी विभागातील ज्या ज्या भागात नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले आहे तेथे बांधावरून पंचनामे करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. सारंगखेडा मंडळाधिकारी जुबेर पठाण, तलाठी डिगराळे, कृषी सहाय्यक अशोक महिरे, भूपेंद्र राजपूत आदी पंचनामे करीत आहेत.
आश्वासन नको, मदत हवी
वर्षभर पिकाला खर्च लावला, क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आता शासकीय यंत्रणा येईल आणि पंचनामे करेल. अर्थात पंचनामे सुरू झाले. लोकप्रतिनिधी येतील, पाहणी करतील; परंतु प्रत्यक्ष मदत मात्र तुटपुंजी मिळते. काहींना तर मिळतच नाही, अशी खंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दर वेळेस नैसर्गिक आपत्तीवेळी लोकप्रतिनिधी भेटी देतात; परंतु वर्षभर राबराब राबून भुईसपाट झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळेल याची शाश्वती मिळत नाही. निदान आतातरी नुकसानभरपाई मिळावी, जेणेकरून चरितार्थ चालवायला गाठीशी दोन पैका असेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.