
Unseasonal Rain : नवापूरसह तालुक्यात अवकाळीमुळे दाणादाण; पिकांचे नुकसान
नवापूर (जि.नंदुरबार) : शहरासह तालुक्यात सोमवारी (ता. ६) दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने काही क्षणांतच शहराला धुऊन काढले. दुपारी साडेतीनच्या सुमारास जोराचे वादळ सुटले. (unseasonal rain Damage to crops in navapur taluka nandurbar news)
विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. होळी सणासाठी लावलेला बाजार आलेल्या वादळात उडाला.
होळी सण असल्यामुळे बाजारपेठेत पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकाने गेल्या आठवड्यापासून थाटली होती. नवापूर तालुक्यात होळी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आठ दिवसांपासून नवापूर, विसरवाडी, चिंचपाडा व खांडबारा येथे बाजारपेठ गजबजली होती.
सोमवारी होळी असल्याने खेड्यापाड्याहून नागरिक गूळ, खोबरे, डाळ्या, खजूर हा बाजार करण्यासाठी आले होते. दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास जोराचे वादळ सुटले. या वादळामुळे शहरात पूर्ण धुळीचे साम्राज्य पसरले. वादळ एवढे मोठे होते, की जवळचा मनुष्य दिसत नव्हता.
होळी सणानिमित्त लावलेली दुकाने वादळात उडाली. तात्पुरत्या स्वरूपात उन्हापासून संरक्षणासाठी टाकलेले छत या वादळी वाऱ्यात उडाल्याने व्यापाऱ्यांची एकच धांदल उडाली. वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे घरी परतणारे लोक आपल्या गावाकडे निघाले, मात्र त्यांना रस्त्यातच पावसाने गाठले.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
आंब्याला आलेला मोहर वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात गळून पडला. त्यामुळे या वर्षी आंबे खाणाऱ्या खवय्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागतील. आंब्याचे उत्पादन बिगरमोसमी पावसामुळे घटणार आहे. आंब्याचा मोहर गळून पडल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडून पडले. गव्हाचे पीक काढण्यावर असताना आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले
वादळी वाऱ्यात होळीची पूजा करण्यासाठी होळीची तयारी सकाळी करून ठेवली होती. अग्रवाल, मारवाडीसह इतर समाजांच्या महिला होळीची पूजा करतात. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे होळी पूजनात व्यत्यय आला. पावसामुळे होळीतील काकड व इतर साहित्य ओले झाल्याने अग्नी प्रज्वलित होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
हवामान खात्याने ५ ते ७ मार्चदरम्यान उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली होती.