Unseasonal Rain : पिकांच्या पंचनाम्याची पूर्व भागात मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Damage crop due to unseasonal rains

Unseasonal Rain : पिकांच्या पंचनाम्याची पूर्व भागात मागणी

नंदुरबार : तालुक्यातील पूर्व भागास गारपिटीने चांगलेच झोडपले असून, पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यां‍च्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला आहे.

महसूल विभागाने त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. (unseasonal rain eastern part has been badly hit by hail crops have suffered nandurbar news)

होळीच्या दिवशी दुपारनंतर वातावरणात बदल झाल्याने सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाला सुरवात झाली. यात वैंदाणे, तलवाडे बुद्रुक, खर्दे खुर्दे, सैताणे, बलवंड, रजाळे, शनिमांडळ, ढंढाणे, वावद परिसरात सायंकाळी अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाल्याने पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.

परिसरात गारपीट झाल्याने गहू, कांदा, मिरची, डांगर, टरबूज, हरभरा, पपई, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन काढणीला आलेल्या काही पिकांमुळे परिसरातील नुकसान झालेले शेतकरी हवालदिल झाले असून, महसूल विभागाने या परिसरात विनाविलंब पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

गारपिटीमुळे तलवाडे बुद्रुक येथे डांगरासह कांदा व गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. परिसरात आधीच खरीप हंगामात पाऊस झाल्याने शेती उत्पन्न घटले होते. कसेबसे सावरत असताना अवकाळीने चिंता वाढविल्या असून, यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

टॅग्स :NandurbarCrop Damage