उद्‌घाटनासाठी शेतकऱ्यांच्या दु:खाचा वापर - डॉ. आ. ह. साळुंखे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

नाशिक - अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी बोलावले आणि निमंत्रण रद्द केल्याने गोंधळ उडाला. टीका होऊ लागली. बेअब्रू झाली. मग साहित्य संमेलन अन्‌ साहित्यिकांची गेलेली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. हे गैर आहे, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आज येथे आसूड उगारला. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी "डॅमेज कंट्रोल'साठी त्यांच्या दुःखाचा संबंधितांनी वापर करून घेतला. असेही टीकास्त्र त्यांनी सोडले.

माणूस म्हणून माणसाला प्रतिष्ठा देण्याऐवजी वापरून फेकून दिले जात आहे. हे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. खरे म्हणजे, अगोदर संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी निमंत्रण दिले असते, तर शेतकऱ्यांच्या प्रती संवेदना आहे, असे स्पष्ट झाले असते, असेही डॉ. साळुंखे यांनी अधोरेखित केले. अमृतमहोत्सवानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या होरायझन अकादमी सभागृहात डॉ. साळुंखे यांचा बळिराजा सन्मान पुरस्कार देऊन के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार अध्यक्षस्थानी होत्या. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, गोपाळ पाटील, प्रा. अर्जुन कोकाटे आदी उपस्थित होते. डॉ. साळुंखे म्हणाले, की शेतीमध्ये शेतकरी भांडवल गुंतवून त्यास दिलेल्या श्रमाच्या पाचपट समाजाला देतात. त्यामुळे कर्जबाजारी कोण, हा खरा प्रश्‍न आहे. कर्ज देणारा शेतकरी असतो आणि आपण त्याच्याकडून कर्ज घेतो. त्यांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज आपण परत नाही. म्हणूनच कर्जमाफी नव्हे, तर शेतकऱ्यांनी समाजासाठी घेतलेल्या कर्जाची फेड, असे संबोधायला हवे.

Web Title: Use of grievances of farmers for inauguration AH Salunkhe