गरज पडल्यास पोलिस बळाचा वापर - मुंढे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नाशिक - शहरातील अति धोकादायक वाड्यांना महापालिका नोटीस देते; परंतु वाडेधारकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अति धोकादायक वाडे खाली करण्यासाठी पोलिस बळाचा वापर करण्याचे सूतोवाच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केल्याने वाडेधारकांत खळबळ उडाली. गावठाणातील वाड्यांवर आयुक्तांनी लक्ष केंद्रित केल्याने सणासुदीत नवा वाद पेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

जुने नाशिक भागातील तांबट लेनमध्ये काळेवाडा जमीनदोस्त झाला. त्यात दोघांना प्राणाला मुकावे लागले, तर तिघे जखमी झाल्याने धोकादायक वाड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. यावर आयुक्त मुंढे यांनी इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांकडे भूमिका स्पष्ट केली. काळेवाडा पडून मृत्युमुखी पडल्याची घटना दुर्दैवी आहे. शहरात जवळपास ३४२ ते ३५० वाडे अति धोकादायक असून, त्या वाड्यांना महापालिका तीन वर्षांपासून पावसाळ्यापूर्वी खाली करण्याच्या नोटिसा देते. परंतु नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांनी धोकादायक वाडे खाली करावेत किंवा डागडुजी करून राहावे जेणेकरून जीव धोक्‍यात जाणार नाही. महापालिका आता धोकादायक वाड्यांना नोटिसा देऊन थांबणार नाही, तर अति धोकादायक वाडे खाली करण्यासाठी पोलिस बळाचा वापर करावा लागेल, असे आयुक्त मुंढे यांनी सांगितले.

काझीच्या गढीवर निर्णय गरजेचा
बुधवार पेठेतील काझीची गढी खासगी मालमत्ता आहे. महापालिकेकडून दर वर्षी नोटिसा दिल्या जातात; परंतु तेथेही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांनी गढी सोडणे गरजेचे असल्याचे आयुक्त मुंढे यांनी सांगितले.

क्‍लस्टर विकासाचा अहवाल
वाड्यांचा विकास करण्यासाठी क्‍लस्टर योजना राबविण्याचा शासनाचा विचार आहे. त्यासाठी क्‍लस्टर इम्पॅक्‍ट स्टडी अहवाल शासनाने मागविला असून, महापालिका त्यावर काम करत आहे. गावठाणात क्‍लस्टर डेव्हलप करण्यासाठी चार एफएसआय देण्याची मागणी आहे. चार एफएसआय दिल्यास वाहतूक, पायाभूत सुविधांवर होणारा परिणाम याचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला जाईल.

वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद मिळत नसेल, तर पोलिस बळाचा वापर करून वाडे खाली करावे लागतील.
- तुकाराम मुंढे,  आयुक्त, महापालिका

Web Title: Use of police if needed says tukaram mundhe