नाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण

खंडू मोरे
बुधवार, 16 जानेवारी 2019

शिक्षण आणि आरोग्य विभागाने घेतलेल्या परिश्रमामुळे उद्दिष्टसफल झाले. ज्या गावांमध्ये या लसीकरणाविषयी शंका उपस्थित केली गेली. त्याठिकाणी पथके जाऊन जनजागृती करीत आहेत. राहिलेले उद्दिष्ट पूर्तीहोईपर्यंत आरोग्य विभागाचे लसीकरण सुरु राहील.

- डॉ विजय डेकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

खामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ७९  हजार ६४६ बालकांना गोवर रुबेलाची लस देण्यात आली. दरम्यान, अद्याप ५९ हजार ६०३ बालकांचे लसीकरण बाकी आहे. मालेगाव तालुक्यात १, ०९, ९४६ व त्या खालोखाल बागलाण तालुक्यात १,०१, ७६८ लाभार्थी होते. सर्वाधिक कमी पेठ ४०६०४ असताना जिल्ह्यातील चांदवड आणि दिंडोरी तालुक्यात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले. नाशिक जिल्ह्याचे ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाले.

केंद्र सरकारने सन २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नाशिक जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून पाच आठवड्याच्या कालावधीमध्ये गोवररुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यात जिल्ह्यातील सर्व शाळा, सरकारी, निमसरकारी, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, आश्रमशाळा, मदरसे, सीबीएससी, आयसीएससी, केंद्रीय विद्यालय आदी शाळांमध्ये पहिल्या दोन ते तीन आठवड्यात व त्यानंतर अंगणवाडी केंद्र व सर्व आरोग्य संस्थेत मोफत लसीकरण करण्यात आले. ही मोहिम आरोग्य, शिक्षण व एकात्मिक बालविकास विभागाच्या समन्वयाने राबविण्यात आली.

यासाठी आरोग्य विभागाने एकूण ११ लाख ३९ हजार ५४९ बालकांना लसीकरणाचे उद्धिष्ट ठेवलेले होते. त्यानुसार आजपर्यंत प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना तसेच ० ते ६ वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्रांवर १० लाख ७९  हजार ६४६ बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या दिवशी जे विद्यार्थी गैरहजर होते. त्यांना अंगणवाडी केंद्रात झालेल्या लसीकरणादरम्यान, लसीकरण करण्यात आले.

एकूणच या लसीकरणामुळे भविष्यातील आजारी पडणाऱ्या मुलांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. मालेगाव तालुक्यातील महानगर कार्यक्षेत्रात मुस्लिमबहुल भागात तसेच स्थलांतर केलेले आदिवासी तसेच सदन तालुक्यातील शेतमजुरांच्या बालकांना पालकांमधील अनास्थेपाई लसीकरणाचे उद्दिष्टे साध्य झाले नाही.

जिल्ह्यात तालुकानिहाय लसीकरणाचे उद्दिष्टे 

बागलाण - १०५८११, चांदवड- ७१०८८, देवळा -४५३४०,दिंडोरी -९८३९८, इगतपुरी -६९५८८, कळवण -६६१५९, मालेगाव -१०९९४६, नांदगाव -६११६५, येवला -६७०५५, नाशिक -६७०९१, निफाड -१४६२१६, पेठ -४०६०४ , सुरगाणा – ५६८०७, सिन्नर -८०२६६, त्रंबकेश्वर -५४०१५.
जिल्ह्यात तालुकानिहाय लसीकरण झालेली संख्या.
 बागलाण—१०१७६८,चांदवड-७०७७६, देवळा -४४०१२,दिंडोरी -९८९२४, इगतपुरी -६५७५०, कळवण -५७८५०, मालेगाव -१०४७८६ , नांदगाव -४९७५०, येवला -६२६४०, नाशिक -६५२७५, निफाड -१३८४६३, पेठ -३७१३२ , सुरगाणा – ५५७१४, सिन्नर -७३६६५, त्रंबकेश्वर -५३१४१.

Web Title: Vaccination of more than 10 lakh children in Nashik