वडजीत ओंडका टाकण्याची प्रथा हद्दपार

सुधाकर पाटील
बुधवार, 18 जुलै 2018

भडगाव - 'जुने जाऊ द्या मरणा लागुनि जाळुनी टाका' ही केशवसुतांच्या "तुतारी' कवितेतील ओवी सार्थ ठरवत वडजी (ता. भडगाव) येथील तरुणांनी दीडशे वर्षांची परंपरा आज खंडित केली आणि "जग चंद्रावर अन्‌ वडजी वेशीवर' हा गावाला लागलेला डाग पुसून काढला. आषाढ महिन्याच्या पहिल्या मंगळवारी भंडाऱ्याच्या दिवशी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारातून पुढील सव्वा महिन्यासाठी लाकडाचा ओंडका टाकण्याची प्रथा होती, जी आजपासून खंडित करण्यात आली. गावाच्या या परिवर्तनवादी भूमिकेचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कौतुक केले आहे.

वडजीत सुमारे दीडशे वर्षांपासून आषाढ महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सव्वा महिन्यासाठी गावाच्या वेशीवर लाकडाचा ओंडका टाकण्याची प्रथा होती. यंदा या परंपरेला विशेषतः तरुणाईने तिलांजली दिली. यामुळे दीडशे वर्षांनंतर पहिल्यांदा गावाच्या वेशीवर लाकडाचा ओंडका दिसून आला नाही.

अशी होती प्रथा
खानदेशात आषाढ महिन्यात भंडाऱ्यांना सुरवात होते. या महिन्यातील मंगळवारी बोकडाचा बळी देतात. पाहुण्यांना मांसाहारी जेवणासाठी आमंत्रित केले जाते. वडजीतही भंडारा होतो. भगताची गावातून मिरवणूक काढली जाते. गावाच्या वेशीतून भगत निघाल्यानंतर प्रवेशद्वारात लाकडाचा ओंडका टाकला जायची येथे प्रथा होती. मग श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमापूर्वी सायंकाळी तमाशातील कलावंतांच्या तगतराव मिरवणुकीसाठी वेशीवरील हा ओंडका काढला जायचा. ही दीडशे वर्षांपासूनची परंपरा सुरू होती.

ग्रामस्थांनी घेतला सर्वांनुमते निर्णय
आठ- दहा वर्षांपूर्वी आजच्या प्रमाणेच काहींनी लाकूड टाकायला तीव्र विरोध केला होता. त्या वेळी लाकूड टाकले गेले नाही. त्यानंतर मात्र परिसरातील इतर गावांत पाऊस झाला व वडजीत पाऊसच झाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी लाकूड टाकण्याची परंपरा मोडली म्हणून मरीआईचा गावावर कोप झाला, असा समज केला आणि पुन्हा तिसऱ्या मंगळवारी लाकडाचा ओंडका टाकण्यात आला. त्यानंतर कोणीही या प्रथेला विरोध केला नाही. यंदा मात्र या प्रथेला तिलांजली देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी सर्वानुमते घेतला आणि ही प्रथा बंद केली.

Web Title: vadaji wood culture