अजिंठा लेणीतील सीसीटीव्ही बंद

विलास जोशी
शुक्रवार, 16 जून 2017

वाकोद (जि.जळगाव) - जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची सुरक्षा भारतीय पुरातत्त्व संरक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या वाऱ्यावर असून सीसीटीव्हीचे अनेक कॅमरे अनेक दिवसांपासून बंद आहेत, त्यामुळे अजिंठा लेणीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तर पुरातत्व विभागाने सीसीटीव्ही दुरुस्तीचा दोन वर्षांपासून प्रस्ताव पाठविला आहे, पण अद्याप काही एक कारवाई झाली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

जागतिक पर्यटनस्थळांना दहशतवादी हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक उपाययोजना राबविल्या. त्याचाच एक भाग म्हणून 2014 मध्ये अजिंठा लेणी भारतीय पुरातत्त्व विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. लेणी क्रमांक 1,2, 9,10,16, 17, 19,26, व्ह्यू पॉइंट, लेणी क्रमांक 8 जवळील पूल आदी ठिकाणी सुमारे बावीस ठिकाणे कायम नजरेखाली ठेवली होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून लेणीच्या सुरक्षा यंत्रणेस बळकटी मिळाली होती.

दरम्यानच्या काळात या कॅमेऱ्याच्या व्यवस्थापनाकडे भारतीय पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले असून लेणीत महत्त्वाच्या ठिकाणांचे अनेक कॅमेरे कित्येक महिन्यांपासून बंद आहे. मॉन्सूनचे आगमन झाल्याने आता अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढून येथील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडणार आहे. त्यातच अजिंठा लेणीचा परिसर डोंगर दऱ्या-खोऱ्यांनी वेढलेला असला तरी चहूबाजूंनी मोकळा आहे. या ठिकाणी सुरक्षेसाठी मानवी बळाचा वापर करणे शक्‍य नाही. त्यामुळे लेणीच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अजिंठा लेणी जगभरातील पर्यटकांना नक्कीच भुरळ घालणारी आहे, परंतु असलेल्या सुविधांचा योग्य वापर होणे अपेक्षित आहे. इतका मोठा खर्च करुन लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे ते सुरू करावे.
- सुरेश जोशी, पर्यटक

Web Title: vakod jalgav news ajintha caves cctv close