'वरदाह'मुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

चक्रीवादळ आणि पावसामुळे बंगळूर, हैदराबादसह सोलापूर, लातूर, उस्मानाबाद आणि मिरजमध्ये ढगाळ हवामान तयार होण्याची चिन्हे आहेत. काही ठिकाणी होणाऱ्या पावसाची शक्‍यता आहे. त्यावर उपाय म्हणून सल्फर फवारणीचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. तसेच बदलत्या हवामानामुळे आर्द्रता वाढून भूरीवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होईल.
- डॉ. एस. डी. सावंत, संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र

दुष्काळाने सोलापूरसह नाशिकमधील उत्पादनात 25 टक्के घटचा अंदाज
नाशिक - "वरदाह' चक्रीवादळासह पाऊस झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. यंदा हवामान चांगले राहिल्याने अपेक्षित उत्पादनाच्या अपेक्षा उंचावलेल्या शेतकऱ्यांना येत्या 24 तासांमध्ये तयार होणाऱ्या ढगाळ हवामानामुळे ग्रासले आहे. पाऊस झाल्यास फुलोऱ्यातील बागांना फटका बसणार आहे. अगोदरच गेल्यावर्षीच्या दुष्काळामुळे सोलापूरसह नाशिकमधील उत्पादनात 25 टक्के घटीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राज्यात जवळपास साडेतीन लाख एकरांवर यंदा द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. त्यातून 25 लाख टनापर्यंत उत्पादन अपेक्षित आहे. अशा बागांमधील 35 ते 40 टक्के बागा फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत पाऊस झाल्यास फुलोऱ्याची गळ होण्यापासून फुलोरा बागेत सडण्यापर्यंतच्या समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय बदलत्या हवामानामुळे पारा आणखी घसरल्यास मणी तडकण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. या साऱ्या परिस्थितीत येत्या 24 तासांमध्ये हवामानाचा अंदाज काय येतो, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

तापमानवाढीचा अंदाज
पुण्याच्या भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी उद्यापासून (ता. 13) किमान तापमानवाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवाय आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. उद्या 10, बुधवारी (ता. 14) 15, गुरुवारी (ता. 15) 16, शुक्रवारी (ता. 16) 15 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान राहण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारनंतर (ता. 17) पुन्हा पारा घसरण्यास सुरवात होईल, असे विभागाच्या शक्‍यतेत नमूद करण्यात आले आहे. याखेरीज बुधवारी आणि गुरुवारी दक्षिण कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाची शक्‍यता वर्तवत असतानाच उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची अंदाज विभागाचा आहे.

Web Title: vardah cyclone effect on grapes