जागतिक आरोग्य दिनानिमित्त 'घनकचरा व्यवस्थापन' व 'सेंद्रिय खत निर्मिती' कार्यशाळा

रोशन खैरनार
सोमवार, 9 एप्रिल 2018

'स्वच्छ व सुंदर सटाणा शहर' ही संकल्पना साकारण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा हातभार लागेल व खत निर्मितीपासून अर्थप्राप्तीही करता येईल, असे प्रतिपादन आर. बी. हर्बल अॅग्रोचे संस्थापक संचालक रामदास पाटील यांनी येथे केले.

सटाणा - शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकाने आपल्या घरी ओला व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभारावा. यामुळे रोगराई नष्ट होऊन 'स्वच्छ व सुंदर सटाणा शहर' ही संकल्पना साकारण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा हातभार लागेल व खत निर्मितीपासून अर्थप्राप्तीही करता येईल, असे प्रतिपादन आर. बी. हर्बल अॅग्रोचे संस्थापक संचालक रामदास पाटील यांनी येथे केले.

येथील कृती फाउंडेशन संचलित नारी सहाय्यता केंद्र व तालुका महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित 'घनकचरा व्यवस्थापन' व 'सेंद्रिय खत निर्मिती' कार्यशाळेत श्री. पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नारी सहाय्यता केंद्राच्या प्रमुख अॅड. सरोज चंद्रात्रे, नगरसेविका व महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा डॉ. विद्या सोनवणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष यशवंत अमृतकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. शांताराम गुंजाळ आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, महिलांनी आपल्या घरातील भाजीपाला, फळं, उरलेलं अन्न, पालापाचोळा तसेच घरातील शिळ अन्न न अन्नपदार्थाचे घटक विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिक ड्रममध्ये (संयंत्र) टाकावे. घराच्या आत, टेरेसवर, गल्ल्यांमध्ये, झाडाच्या बुंध्याशेजारी, पदपथाचा कोपरा, सोसायटीचे तळघर, छत, आवार, जमेल तिथे हे संयंत्र ठेवावेत. स्वयंपाकघरातील कुजण्यायोग्य कचरा घरातच वेगळा करून सेंद्रिय पद्धतीने कुजवण्यासाठीच्या संयंत्रात ठेवावा. संयंत्रात कल्चर नावाची पावडर टाकल्यास काही दिवसातच कचरा कुजतो व त्याचे खत तयार होते. हा कचरा साठवतांना त्यापासून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी, कीटक व डासांचा प्रादुर्भाव होत नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

एड.सरोज चंद्रात्रे म्हणाल्या, घरातील ओला कचरा हा कचरा नसून ते सोनं आहे. 'सुंदर शहर' बनविण्यासाठी प्रशासनाबरोबरच महिलांनी जागरूकतेने सेंद्रिय खतनिर्मितीत सहभाग घ्यावा. नगरसेविका डॉ.विद्या सोनवणे यांनी दररोज जमा होणारा कचरा महिलांनी फेकून देण्यापेक्षा या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मिती करावी व त्यातून कुटुंबासाठी घरबसल्या पैसेही मिळवावेत असे आवाहन केले. आयोजकांतर्फे महिलांना कचरा कुजवण्यासाठी लागणारी पावडर व प्लास्टिकचे ड्रम (संयंत्र) वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास डॉ. मनोहर सोनवणे, एड.दिलीप चंद्रात्रे, महेंद्र पवार, राहुल चंद्रात्रे, संजय गोसावी, समको बँकेच्या माजी अध्यक्षा रुपाली कोठावदे, स्मिता शहा, नारी सहाय्यता केंद्राच्या स्नेहल अंधारे, भारती अंधारे, अनिता ईसई, कल्पना पवार, प्रतिमा शिंदे, अपेक्षा चव्हाण, मोहिनी चंद्रात्रे, शीतल जाधव, एड.सुजाता पाठक, छाया सोनवणे, शिल्पा अंधारे, शुभांगी चंद्रात्रे, सुरेखा चंद्रात्रे आदींसह महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Various Workshops Done On The Occasion Of World Health Day