चालकाच्या गळ्याला चाकू लावून मध्यरात्री वाहनचोरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

चोरट्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका केलेल्या चालकाने याबाबत साक्री (जि. धुळे) आणि जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 

सटाणा - वाहनचालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बेदम मारहाण करत मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनासह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एखाद्या रहस्यमय चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असा हा प्रकार नाशिक व धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील चिराई (ता. बागलाण) येथील देवी मंदिराजवळील घाटात काल सोमवार (ता. 23) ला मध्यरात्री एक वाजता घडला. चोरट्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका केलेल्या चालकाने याबाबत साक्री (जि. धुळे) आणि जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जायखेडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवार (ता. 23) ला सकाळी चालक सागर सुभाष राणे (32, टेंभीपाडा रोड, भांडूप, मुंबई) हा विलेपार्ले (मुंबई) येथून सिल्व्हर रंगाच्या होंडाई एक्सेट चारचाकी (क्रमांक एम एच 03 सीएच 2840) या वाहनाने सय्यद पठाण (वय अंदाजे 28 ते 30) व त्याच्या अन्य दोन साथीदारांना (नाव माहित नाही) घेऊन धुळे येथे निघाला होता. नामपूरमार्गे धुळे येथे जात असताना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास नामपूर - साक्री रस्त्यावरील चिराई (ता. बागलाण) येथील घाटात लघुशंकेचे कारण सांगून सय्यद पठाण व त्याचे दोन्ही साथीदार वाहनाच्या खाली उतरले. त्यानंतर त्यांनी अचानक चालक सागरच्या गळ्याला चाकू लावला आणि त्याला बेदम मारहाण सुरु केली. मारहाणीवेळी त्यांनी सागरकडील रोख 1500 रुपये, दोन हजार रुपये किंमतीचा सेमसंग कंपनीचा मोबाईल, एटीएम कार्ड, वाहनाचे कागदपत्र व वाहन असे एकूण 4 लाख 3 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. याबाबत आधी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून नंतर तो जायखेडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गावित यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात चोरट्यांचा तपास सुरु आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The vehicle was stolen at midnight in satana