मंगळवेढ्यात पोलिस ठाण्याच्या आवारातील वाहने चोरीला

हुकूम मुलाणी
शनिवार, 8 डिसेंबर 2018

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु आहे. यातील चोराला लवकरच ताब्यात घेतले जाईल. 

- महेश विधाते, सहायक पोलिस निरीक्षक

मंगळवेढा : पोलिस ठाण्याच्या आवारात जप्त केलेला ट्रॅक्टर व मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चक्क ठाण्याच्या आवारातून चोरून नेल्याची घडली असून, याबाबत मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यात विविध गुन्ह्यात कारवाई केलेली वाहने उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाण्याच्या आवारात जप्त करून लावली जातात. पण याला सरंक्षक भिंत नसल्याचा फायदा घेत या जप्त केलेल्या वाहनातील (एमएच १३. बी.आर ५२०३) या क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रेलरसह तसेच (एम.एच १३ सी.एफ ५०२४) ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली याबाबतची फिर्याद महिला पोलिस कॉन्स्टेबल मोनिका वाघे यांनी दिली. त्यानुसार, अज्ञात चोरांविरोधात भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते करीत आहेत.

मंगळवेढा पंढरपूर मार्गावरील पोलिस ठाण्याला सरंक्षक भिंत नसल्यामुळे कारवाईतील मालमत्ता उघड्यावर असून, यातील वाहने पोलिसांच्या तोकड्या संख्येमुळे चोरी करण्यास शक्य होत असल्याचे वृत्त 'सकाळ'ने यापूर्वीच प्रसिद्ध करून पोलिस प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. तशी घटना देखील तरीही याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष या चोरीच्या घटनेस कारणीभूत ठरले असले तरी वरिष्ठ पोलिस अधिकारी जागे होणार का ? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

Web Title: Vehicles Stolen from Police Station in Mangalwedha Nashik