भाजपच्या मौनामुळे तिरंगी लढतीचा सस्पेन्स

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नाशिक - भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिला नाही आणि उघड पाठिंबाही दर्शविलेला नाही. त्यामुळे भाजपच्या एकगठ्ठा 167 मतांचे दान कुणाच्या पारड्यात पडणार, हा सस्पेन्स कायमच आहे. त्यामुळे उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. सोबतच रिंगणातील विविध लहान लहान पक्षांतील 37 मतांना महत्त्व आले आहे.

नाशिक - भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिला नाही आणि उघड पाठिंबाही दर्शविलेला नाही. त्यामुळे भाजपच्या एकगठ्ठा 167 मतांचे दान कुणाच्या पारड्यात पडणार, हा सस्पेन्स कायमच आहे. त्यामुळे उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. सोबतच रिंगणातील विविध लहान लहान पक्षांतील 37 मतांना महत्त्व आले आहे.

उमेदवार नसूनही विजयाचे पारडे कुणाच्या बाजूने झुकवायचे, याचा "पत्ता' अजूनही भाजपच्याच हातात आहे. पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह इतर ठिकाणचे गणित डोळ्यांसमोर ठेवत आतापर्यंत भाजपने अतिशय सावध पावले टाकली. पक्षादेश नाही, एवढेच त्रोटक उत्तर देताना स्थानिक नेत्यांनी पक्षीय भूमिकेबाबत उतावीळपणा न दाखविता संयम दाखवीत, सस्पेन्स कायम टिकविला. स्पर्धेतील दोन्ही उमेदवारांपैकी ज्याच्या पारड्यात ही मते जातील, त्याच्याकडे विजयाचे पारडे झुकणार असल्याने भाजपने त्याबाबत मौन राखल्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे.

कानमंत्राकडे लक्ष
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर असून, सोमवारी (ता. 14) ते ऍड. सहाणे यांच्यासाठी बैठक घेणार आहेत. त्यात, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करणार आहेत. आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांची बैठक महत्त्वाची आहे. पण, त्यात पवार गणिताची गोळाबेरीज वाढविण्यासाठी काय कानमंत्र देतात, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. कागदावर आघाडीकडे 171 मते आहेत. पण कॉंग्रेस आघाडीला पहिल्या पसंतीच्या विजयासाठी आणखी 150 मतांचे गणित जुळविण्याचे आघाडीसमोर आव्हान आहे. सोमवारच्या बैठकीत त्यात काय कानमंत्र दिला जातो, याकडे लक्ष आहे.

शिवसेनेचे "वेट ऍन्ड वॉच'
शिवसेनेने 211 मतदानाच्या पलीकडे जाण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या आहेत. त्यानुसार शिवसेनेच्या गोटातून भेटीगाठी सुरू आहेत. स्वबळ हेच सूत्र घेऊन प्रचाराला लागलेल्या शिवसेनेसोबत युती असल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मालेगावला जाहीर केले असले, तरी भाजपच्या स्थानिक यंत्रणेकडून मात्र तसा कुठलाही प्रतिसाद नाही. पक्षांकडून अद्याप कुठलाही आदेश नाहीच, हे पालुपद स्थानिक भाजपकडून कायम असल्याने शिवसेनेलाही भाजपच्या मतांचा अंदाज येईना. त्यामुळे एकला चलो रे न्यायाने उमेदवारांची व त्याच्यासोबत प्रामाणिक असलेल्या शिवसेनेतील एका गटाकडून मात्र जोरदार तयारी सुरू आहे.

Web Title: vidhan parishad election BJP politics