राष्ट्रवादीची चलाख खेळी; ॲड. सहाणे रिंगणात

NCP
NCP

नाशिक - शिवसेनेत पाळेमुळे घट्ट झालेली असताना मराठा क्रांती मोर्चानंतर पक्षापासून दुरावलेल्या आणि नंतर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून हकालपट्टी झालेले ॲड. शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी (ता. २) पक्षात घेत तत्काळ निवडणूक रिंगणात उतरवत नाशिकच्या जागेची निवडणूक आणखी चुरशीची केली. बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत दुपारी तत्काळ उमेदवारी अर्जही पदाधिकाऱ्यांच्या गर्दीत ॲड. सहाणे यांनी दाखल केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अवघ्या तीन दिवसांपूर्वी निवड झालेले जयंत पाटील सकाळी विशेष विमानाने नाशिकला येताच शहरात राजकीय घडामोडी वेगाने घडल्या आणि पक्षाने आपले पत्ते खोलत ॲड. सहाणे यांच्या रूपाने आपली दावेदारी पेश केली. दुपारी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात ॲड. सहाणे यांचा पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. पाटील यांच्याशिवाय आमदार अपूर्व हिरे, जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादीने तुल्यबळ लढतीचे संकेत दिले. आमदार नरहरी झिरवाळ, श्रीराम शेटे, दिलीप बनकर, महापालिकेतील गटनेते गजानन शेलार, निवृत्ती अरिंगळे, विष्णुपंत म्हैसधुणे,अद्वय हिरे, अर्जुन टिळे, नानासाहेब महाले, भारती पवार, जयश्री पवार, ॲड. प्रेरणा बलकवडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेत चांगले रुळलेले असताना ॲड. सहाणे यांची शिवसेनेतून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हकालपटटी झाली. मराठा आरक्षणासंदर्भात खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासमवेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने कारवाई केली. त्यातच खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केल्याने दोघांमध्ये मध्यंतरी जुगलबंदीही रंगली होती. 

शिवसेनेने काढल्यानंतर ॲड. सहाणे उमेदवारीसाठी भाजपच्या संपर्कात होते. परंतु भाजपचे तळ्यात- मळ्यात सुरू असताना राष्ट्रवादीने बुधवारी वेगाने हालचाली करत त्यांना पक्षात घेत थेट निवडणूक रिंगणात उतरविले. संजय राऊत यांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या नाशिक भेटीत शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचाच फारसा प्रतिसाद मिळाला नाही, हेही राष्ट्रवादीच्या चाणाक्ष नेत्यांनी हेरत ॲड. सहाणे यांना पटकन उचलून शिवसेनेबरोबर भाजपची कोंडी करत एकाच दगडात दोन पक्ष्यांचा नेम साधला. ॲड. सहाणे यांनी मतांचे गणित पक्के केले असून, मागच्या वेळी आलेले अपयश या वेळी धुऊन काढण्याचा पवित्रा त्यांच्या देहबोलीतून दिसत आहे. भाजपने उमेदवारीसाठी चालविलेली टाळाटाळ ही उगीचच नसून शिवसेनेला धडा शिकविला जाईल, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे यंदाची नाशिकची निवडणूक ॲड. सहाणे विरुद्ध शिवसेना असेच चित्र आत्तातरी आलेले आहे.       
    
जयवंतरावांचाच पेन
पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला. तेथे मोठ्या संख्येने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक कक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी उमेदवारासह पाचच जणांना प्रवेश देत इतरांना बाहेर काढले. त्यानंतर उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी सहाणे यांनी जयवंत जाधव यांचाच पेन घेतला. तेथे परस्परांची गळाभेट चर्चेचा विषय ठरली. 

हिरे कुटुंबाला ऑफर
काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधून असलेल्या आमदार अपूर्व हिरे व जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे हे बुधवारी सहाणे यांच्या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी भवनात उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरपणे माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी आपल्यासोबत काम केले आहे. त्यामुळे हिरे कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, असे आवाहन केले.

दराडे आज अर्ज भरणार
शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे गुरुवारी (ता. ३) शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेचे संर्पक नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे शहर- ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांसमवेत ते 
अर्ज भरणार आहेत.

ॲड. सहाणेंचा विजय...
ॲड. सहाणे काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी इच्छुक होते. गेल्या वेळी अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत निकालानंतर अनेक वर्षे न्यायालयातही दोघांत लढाई सुरू होती, पण अखेरच्या क्षणी जयवंत जाधव यांनीही ॲड. सहाणे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. मी ज्या उमेदवाराची शिफारस केली आहे, त्यांचा कधी पराभव झालेला नाही. त्यांचा विजयच झाला आहे, असे सांगून श्री. पाटील यांनी ॲड. सहाणे हेच विजयी होतील, असा दावा केला. येत्या ३१ मेपर्यंत बूथनिहाय कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी. मे महिन्यात तालुका व जिल्हास्तरीय संघटनात्मक बांधणी पूर्ण होईल. पक्ष बळकट करू शकणारे तालुकाध्यक्ष नेमले जातील, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

लातूर- बीड मतदारसंघ राष्ट्रवादीचाच 
लातूर- बीड- उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने परस्पर उमेदवारीचा दावा केल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीविषयी अनिश्‍चितता आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘हा मतदारसंघ आमचाच आहे. काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रश्‍नच नाही,’ असा दावा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com