अर्ज माघारीसाठी जत्रा, तडजोडीचा "खुला बाजार'

अर्ज माघारीसाठी जत्रा, तडजोडीचा "खुला बाजार'

जळगाव - मी आहे..तुम्ही या..उमेदवारी मागे घ्या. आले..दोन आले..अरे, आता किती राहिले?.. एक लाख? एवढ्यात काय होतेय हो.. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेलेले इच्छुक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातून थेट बाहेर..असा तडजोड आणि धावपळीचा "खुला बाजार' उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात सुरू होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यत तडजोड सुरूच होती. राज्यातील दोन मंत्री स्वतः याप्रसंगी उपस्थित होते. मात्र, तरीही सर्व प्रयत्न फोल ठरून निवडणूक बिनविरोध अखेर झालीच नाही.

विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती. भाजपचे उमेदवार डॉ. गुरुमुख जगवानी विजयी झाले होते. त्याच पद्धतीने यावेळीही ही निवडणूक बिनविरोध करण्याची अपेक्षा भारतीय जनता पक्षातर्फे सुरू होती. भारतीय जनता पक्षाचे चंदू पटेल, माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह एकूण 28 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे भाजपचे चंदू पटेल वगळता एकूण 27 इच्छुकांची माघार कशी होणार, याबाबत उत्सकुता होती. त्या अनुषंगाने भाजपचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी प्रयत्नशील होते.

चंदू पटेल यांच्या घरी व्यूहरचना
भाजपचे उमेदवार चंदू पटेल यांच्या ओंकारेश्‍वर मंदिराजवळील निवासस्थानी इच्छुकांच्या उमेदवारी अर्ज माघारीसंदर्भात व्यूहरचना सुरू होती. राज्याचे जलसंपदामंत्री महाजन, सहकार राज्यमंत्री पाटील यांच्यासह माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी व भाजप नेते उपस्थित होते. दुपारी बारानंतर या ठिकाणच्या हालचाली अधिक गतिमान झाल्या. मंत्री महाजन व डॉ. जगवानी मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होते. दोघे एकांतात जाऊन चर्चा करीत, तर कधी कार्यकर्त्यांत त्यांची चर्चा सुरू होती.

देवकरांची अचानक माघार
दुपारी दीडला जिल्हाधिकारी कार्यालयात एक कार सुसाट आली. काही कळण्यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर एकटेच या कारमधून खाली उतरले. कोणाशी काहीही न बोलता ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेले अन्‌ तेथे त्यांनी उमेदवारी माघारीचा अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. देवकरांनी उमेदवारी मागे घेतल्याने या निवडणुकीतील चुरसच निघून गेली.

महाजन, पाटलांसह कार्यकर्त्यांची धावपळ
दुपारी दोननंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज माघारीसाठी खऱ्या अर्थाने धावपळ सुरू झाली. मंत्री महाजन व गुलाबराव पाटील यांच्यासह महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे यांच्यासह माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, खानदेश विकास आघाडीचे कैलास सोनवणे, नितीन बरडे आदी हजर झाले. त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार सुरेश भोळे, अशोक कांडेलकर, ऍड. किशोर काळकर, विशाल त्रिपाठी आदीही आले. बरडे, कोल्हे, डॉ. जगवानी, गोविंद अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर कांडेलकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर कोणाचे उमेदवारी अर्ज माघारीविना राहिले, याची चर्चा सुरू झाली.

महाजनांचा सतत मोबाईलवरून संपर्क
मंत्री महाजन संपूर्ण सूत्रे हाताळत असल्याचे दिसून आले. ते सतत मोबाईलवरून संबंधित इच्छुक उमेदवारांच्या संपर्कात होते; तर त्या ठिकाणी उपस्थित कायकर्ते संबंधित इच्छुक उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात आले की आले...आले... असे त्यांना सांगत होते. त्याचवेळी आता कोण राहिले, याचीही विचारणा होत होती.

कॉंग्रेस उमेदवारांची माघार
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील दुपारी अडीचला जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांच्यासमवेत "इंटक'चे अध्यक्ष डी. जी. पाटील होते. तसेच लता छाजेडही होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाजवळ आल्यानंतर मंत्री महाजन यांच्याशी ऍड. संदीप पाटील यांनी हस्तांदोलन केले. त्यानंतर लता छाजेड यांनी उमेदवारी आर्ज मागे घेतला. त्यानंतर ऍड. पाटील यांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली व तेथून निघून गेले.

अमोल, विजय पाटलांची प्रतीक्षा
उमेदवारी अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटे उरले असल्याची घोषणा झाली त्यावेळी रिंगणात दहा इच्छुक असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी निवडणूक बिनविरोध होणार अशीही चर्चा सुरू होती. मात्र, पारोळ्याचे माजी आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल व जळगावचे विजय भास्कर पाटील यांची उमेदवारी कायम होती. त्यांनी अर्ज मागे घेण्यासंदर्भात प्रतीक्षा होती. त्याचदरम्यान अमोल चिमणराव पाटील आले. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तद्‌नंतर संजय पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजय चौधरी यांच्यासह इतर दोन अपक्षांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतले.

विजय पाटलांसह सात अपक्ष रिंगणात
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पाच मिनिटे उरल्याची घोषणा होताच पुन्हा सर्वत्र धावपळ सुरू झाली. त्यात एक अपक्ष उमेदवार माघारीसाठी आले ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत गेलेही मात्र माघार न घेताच मागे परतले. त्यानंतर वेळ संपल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांकडून झाली. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. आता भाजपचे उमेदवार चंदू पटेल यांच्याविरोधात सात अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यात प्रमुख उमेदवार ऍड. विजय भास्कर पाटील असल्याने सर्वांचे लक्ष आता प्रत्यक्ष लढतीकडेच असणार आहे.

कोण काय म्हणाले?
आमच्यासाठी पक्षांची माघार
गिरीश महाजन (जलसंपदामंत्री) - भाजपचे उमेदवार चंदू पटेल यांच्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे व खानदेश विकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली, यातच आमचा विजय आहे. आता आमचा उमेदवार हा सर्वपक्षीय आहे. त्यामुळे त्याचा विजय निश्‍चित आहे.

आम्ही युती पाळतो
गुलाबराव पाटील (सहकार राज्यमंत्री) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आम्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. आम्ही नेहमीच युती पाळतो. कुणी ती पाळो अथवा न पाळो, असा टोलाही त्यांनी उपरोधिकपणे लगावला.

नेत्यांच्या आदेशाने माघार
गुलाबराव देवकर (माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते) - विधान परिषद निवडणुकीसाठी मी पक्षाचे नेते शरद पवार व अजित पवार यांच्या आदेशावरून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात आदेश आला. त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला. पक्षादेशाला मी मानतो. मी रिंगणात असतो, तर शंभर टक्के निवडून आलो असतो.

जगताप, चव्हाणांचा आदेश
ऍड. संदीप पाटील (जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस) - विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारी प्रदेशस्तरावरून निश्‍चित झाली होती. त्यानुसारच आमच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याचे प्रभारी भाई जगताप यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जगताप यांनी आम्हाला इच्छुकांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असा आदेश दिला. त्यानुसार आम्ही अर्ज मागे घेतला आहे.

विजय पाटलांसाठी माघार
अमोल चिमणराव पाटील - शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी त्यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, की मी अपक्ष उमेदवार विजय भास्करराव पाटील यांच्यासाठी माघार घेतली. त्यांना माझा पाठिंबा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com