Vidhan Sabha 2019 : मालेगाव मध्यमध्ये भाजपने उमेदवार बदलला; येवल्यात मनसे बाहेर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 October 2019

 विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या शनिवारी (ता. ५) झालेल्या अर्ज छाननीत मालेगाव बाह्य आणि येवल्यातून उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने मनसे रिंगणातून बाहेर पडली.

विधानसभा 2019  
नाशिक - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या शनिवारी (ता. ५) झालेल्या अर्ज छाननीत मालेगाव बाह्य आणि येवल्यातून उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने मनसे रिंगणातून बाहेर पडली. त्याच वेळी आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा अवैध अर्जांत समावेश आहे. मालेगाव मध्यमधून भाजपने उमेदवार बदलत नगरसेविका दीपाली वारूळे यांना संधी दिली असून, पक्षाचे काम करणारे शेख इब्राहीम यांना उमेदवारी मिळाली नाही.

मनसेचे मच्छिंद्र शिर्के यांच्या बी फॉर्ममध्ये उमेदवाराचे नाव नव्हते. आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी अनामत रक्कम भरली नाही. येवल्यातून मनसेच्या उमेदवारांनी एबी फॉर्म जोडला नव्हता. त्यांच्यासह आणखी एक अर्ज अवैध झाला. मालेगाव मध्यमधून १९ पैकी ५ जणांचे अर्ज अवैध झाले. बागलाणमधून चार अर्ज अवैध ठरविण्यात आले असून, त्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा समावेश आहे.

१५ जागांसाठी २१२ उमेदवार 
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या २४३ पैकी ३१ अर्ज अवैध झाले आहेत. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात २१२ उमेदवार उरले आहेत. ७ ऑक्‍टोबरला माघारीची मुदत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकराला चार ठिकाणी, तर जिल्ह्यात ११ ठिकाणी एकाच वेळी अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू झाली. नाशिक शहरातील तीन व इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर अशा चार मतदारसंघांतील सहा उमेदवारांचे अर्ज बाद झाले. नाशिक मध्य व इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरमध्ये प्रत्येकी दोन, तर पूर्व आणि पश्‍चिम मतदारसंघातून प्रत्येकी एक अर्ज बाद झाला. देवळाली मतदारसंघात एकही अर्ज बाद झाला नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश श्रिंगी यांनी स्पष्ट केले. मध्य मतदारसंघात मनसेचे अधिकृत उमेदवार नितीन भोसले यांचा अर्ज वैध ठरल्याने त्यांच्या पत्नी गीता यांचा अर्ज बाद झाला. अपक्ष भगवान कांबळे यांच्या अर्जावर एकच सूचक असल्याने अर्ज अवैध ठरला. नाशिक पश्‍चिम मतदारसंघातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. डी. एल. कराड यांचा अर्ज वैध ठरल्याने दुसरे उमेदवार तानाजी जायभावे यांचा अर्ज बाद झाला. योगिता हिरे, दिलीप भामरे, मंगेश पवार, दत्ता अंभोरे, महेश हिरे, विलास शिंदे, बळिराम ठाकरे, मनीषा साळुंके व प्रशांत खरात यांच्या अर्जासोबत पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नसल्याने त्यांचे पक्षीय उमेदवारीचे अर्ज बाद झाले. त्यांचे अपक्ष अर्ज मात्र कायम राहिले आहेत. इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरमधून दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. अपक्ष उमेदवार अशोक झोले यांचा अर्ज अपूर्ण असल्याने तो बाद झाला. भारतीय ट्रायबल पार्टीकडून पोपट दामू वाघ हे पर्यायी उमेदवार असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तेजस चव्हाण यांनी सांगितले. नाशिक पूर्वची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. डॉ. राजेंद्र धनवटे या अपक्षाने अनामत रक्कम भरली नव्हती. उमेदवारीसाठीचे प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. शपथही घेतली नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला.

अर्ज छाननीनंतरची स्थिती
मतदारसंघ    बाद अर्ज    शिल्लक
नांदगाव    १    २८
मालेगाव मध्य    ५    १४
मालेगाव बाह्य    २    ११
बागलाण    ४    १५
कळवण-सुरगाणा    २    ८
चांदवड-देवळा    १    १४
येवला    २    १४
सिन्नर    ४    १०
निफाड    ३    ९
दिंडोरी-पेठ    १    ८
नाशिक पूर्व    १    १४
नाशिक मध्य    २    १०
नाशिक पश्‍चिम    १    २९
देवळाली    ०    १६
इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर    २    १२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha BJP changes candidate in Malegaon center