Vidhansabha 2019 : लोकसभेच्या प्रचारातच विधानसभेचे ‘सेटिंग’

Jalgaon-Vidhansabha
Jalgaon-Vidhansabha

लोकसभेसाठी भाजपच्या वर्चस्वाची परंपरा जळगावात असली, तरी सहाही विधानसभा मतदारसंघांत शिवसेना, ‘राष्ट्रवादी’ची ताकद तुल्यबळ आहे.

लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपातील अंतर्गत बंडाळी, उमेदवारी कापणे आणि त्याचे पर्यावसन व्यासपीठावरील हाणामारीत झाल्याने त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत उमटणार, हे निश्‍चित. त्यातूनही अनेकांनी विधानसभेसाठी आपली घडी बसविल्याचे या निवडणुकीतून समोर आले आहे.

जळगाव विधानसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला आहे. मात्र गतवेळी युती तुटल्याने भाजपचे सुरेश भोळे यांनी शिवसेनेचे सुरेश जैन यांचा पराभव केला होता. या वेळी जैन यांनी रिंगणात उतरणार नसल्याची घोषणा केली आहे, मात्र ते एकवेळ उभे राहतीलच, असे त्यांचे समर्थक सांगताहेत; तर भाजपतर्फे सुरेश भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर ललित कोल्हे यांची तयारी आहे. युती कायम राहून मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास भोळे शिवसेनेतर्फे लढण्याची शक्‍यता आहे. याशिवाय जैन यांचे कट्टर समर्थक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे यांचेदेखील नाव चर्चेत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने महानगराध्यक्ष राध्येश्‍याम चौधरी यांचे नाव पुढे येऊ शकते. 

गुलाबराव पाटलांना वाट मोकळी?
जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना नेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ‘राष्ट्रवादी’चे गुलाबराव देवकर यांच्यात लढतीची शक्‍यता होती. देवकरांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने आता ‘राष्ट्रवादी’तर्फे येथून त्यांचे पुत्र विशाल, जिल्हा बॅंक संचालक संजय पवार, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन यांचीही तयारी सुरू आहे. युती झाली नाही, तर भाजपतर्फे पी. सी. पाटील, चंद्रशेखर अत्तरदे यांचीही दावेदारी होऊ शकते.

पाचोऱ्यात वाघ, पाटील लढत
पाचोरा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील विरुद्ध ‘राष्ट्रवादी’चे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यात पुन्हा लढतीची शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकीत वाघ यांनी ‘राष्ट्रवादी’च्या देवकरांच्या प्रचाराची धुरा वाहिली, तर पाटील यांनी भाजपच्या पाटलांचा प्रचार केला. मात्र भाजपमधूनही प्रा. डॉ. अस्मिता पाटील, डॉ. संजय पाटील यांची उमेदवारीची तयारी आहे. 

‘राष्ट्रवादी’ची जोरदार तयारी
अमळनेर मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ने जोरदार तयारी चालवली आहे. अनिल भाईदास पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. भाजपमध्ये मात्र खूप वाद आहेत. अपक्ष आमदार शिरीष चौधरी भाजपची उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र ‘राष्ट्रवादी’चे माजी आमदार आणि सध्या भाजपत असलेले साहेबराव पाटील यांचीही भाजपकडून लढण्याची इच्छा आहे. 

काका विरुद्ध पुतण्याची तयारी
जिल्ह्यात एरंडोल-पारोळा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’चे डॉ. सतीश पाटील एकमेव आमदार आहेत. युतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. माजी आमदार चिमणराव पाटील यांची तयारी झालीच आहे. मात्र, भाजपचे नगराध्यक्ष करण पाटील यांनीही आमदारकीसाठी बांशिग बांधले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी जोर लावलाय. ते आमदार डॉ. पाटील यांचे पुतणे आहेत. त्यामुळे काका विरुद्ध पुतण्याची लढत होण्याची शक्‍यता आहे. मात्र युती झाली तर ही जागा शिवसेनेकडून चिमणराव पाटील लढण्याची शक्‍यता आहे.

चाळीसगावात देशमुखांना संधी
चाळीसगाव मतदारसंघात माजी आमदार राजीव देशमुख यांनी पाच वर्षांत चांगली तयारी केली आहे. या वेळी त्यांना यशाची संधी आहे. भाजपतर्फे त्यांच्याविरुद्ध मंगेश चव्हाण, कैलास सूर्यवंशी संभाव्य उमेदवार असतील. बेलगंगा कारखाना सुरू करणारे चित्रसेन पाटील यांचीही तयारी आहे. मात्र ते कोणत्या पक्षातर्फे उभे राहणार, हे निवडणुकीतच समजेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com