विजया राजाध्यक्षांना "जनस्थान' पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

""कुसुमाग्रज हे माझ्या शालेय जीवनापासून ते आजतागायतचे दैवत आहेत. त्यांच्याशी व्यक्ती आणि वाचक म्हणून जोडलेले आंतरिक नाते प्रेरणादायी राहिले आहे. अशा प्रेरणा प्रत्येकाने घ्यायला हव्यात. त्यामुळे आजच्या पुरस्कारामुळे आनंद होत असतानाच तात्यासाहेब आपल्यात आहेत, अशी जाणीव तयार झाली आहे.'' 
- विजया राजाध्यक्ष (ज्येष्ठ लेखिका) 

नाशिक - ज्येष्ठ लेखिका व समीक्षक-कथाकार विजया मंगेश राजाध्यक्ष यांना यंदाचा मराठीतील मानाचा "जनस्थान' पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर ठसा उमटविणाऱ्या, मराठी भाषेतून गौरवास्पद लेखन करणाऱ्या साहित्यिकाला हा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देऊन सन्मानित केले जाते. 

प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्यासह मुंबईत पुरस्कार निवड समितीचे सदस्य सतीश तांबे, दा. सु. वैद्य, रेखा इनामदार-साने, मोनिका गजेंद्रगडकर, अनुपमा उजागरे यांची मुंबईत बैठक झाली. त्यानंतर निवड समितीने विजया राजाध्यक्षांच्या नावाची घोषणा मुंबईत केली. त्याचबरोबर नाशिकमध्ये प्रतिष्ठानचे कार्यवाह प्राचार्य मकरंद हिंगणे, सहसचिव अरविंद ओढेकर यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कार जाहीर केला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 27 फेब्रुवारीला महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक वर्षाआड दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे स्वरुप आहे. 

Web Title: vijaya rajadhyaksha Janasthan Award