‘तो’ शौकच तसा येडपट होता...

डॅा. कैलाल कमोद
रविवार, 8 जानेवारी 2017

आज सिनेमा ही फक्त थिएटरमध्ये बसून पाहण्याची करमणूक राहिली नाही. ती घरातल्या टीव्हीपासून तर बसमध्ये फिरताना मोबाईलमध्येही पाहायला मिळू लागल्यावर विशिष्ट थिएटरमध्ये बसून पाहण्याचे आकर्षण कमी झाले असावे. साहजिकच नवीन पिढीला सिनेमाचे आकर्षण कमी झाल्याचा भास होतो. आज पन्नाशी पार केलेल्या पिढीचे मात्र सिनेमाशी घट्ट भावबंध जुळले होते.

आमच्या काळात बहुतेक जणांनी पहिला सिनेमा पाहिला तो रस्त्यावर बसून. त्या काळात दारूबंदी आणि कुटुंबनियोजन हे दोन विषय देशासाठी मेन टार्गेट होते. त्यामुळे या दोन उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी जनजागृती करण्यासाठी नाशिक नगरपालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या मोहिमेचा भाग म्हणून गल्लीगल्लीत सिनेमा दाखविला जायचा. हा सिनेमा म्हणजे अर्धा-एक तासाची डॉक्‍युमेंटरी असायची. पण आपण सिनेमा पाहिल्याचा खूप आनंद व्हायचा. पूर्ण तीन तास लांबीचा रस्त्यावर बसून पाहिलेला सिनेमा होता ‘प्रपंच’. भारंभार मुले होत गेल्याने एका कुंभार कुटुंबाची झालेली वाताहत, अशी ती कथा होती. ग. दि. माडगूळकरांची कथा खूप परिणामकारक, तर गाणी खूप श्रवणीय होती. ‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार’ हे सुधीर फडक्‍यांचे भक्तिगीत याच सिनेमातले. अस्सल मराठी कुटुंबातली कर्ती बाई म्हणून सुलोचनाबाई शोभत. पुढे नामवंत कलाकार झालेले संधिकाल मोघल यांचा हा पहिला सिनेमा. ‘हा माझा मार्ग एकला’ या नावाचा दारूचे दुष्परिणाम दाखविणारा एक पूर्ण सिनेमा रस्त्यावर पाहायला मिळाला.

पैसे खर्च न करता नाशिकमध्ये सिनेमा पाहायचा आणखी एक मार्ग होता ‘पोलिस लाइन’. सीबीएसमागे असणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत पोलिसांसाठी महिन्यादोन महिन्यांतून एखादा मोकळ्या जागेत जुना ब्लॅक ॲण्ड व्हाइट सिनेमा दाखविला जाई. नाशिकच्या इतर भागातील पोरंटोरं सायकल घेऊन लांब गावांच्या बाहेर पोलिस लाइनला पिक्‍चर बघायला जात. दिलीपकुमार आणि देव आनंदचा ‘इन्सानियत’ तिथं पाहिल्याचे आठवते.

थिएटरमध्ये बसून पहिला सिनेमा अनपेक्षितपणे पाहायला मिळाला इयत्ता सहावीत असताना. पंतप्रधान नेहरूंचे निधन झाले होते, २७ मे १९६४ या दिवशी. त्यानंतर काही महिन्यांनी नेहरूंच्या अंत्ययात्रेची डॉक्‍युमेंटरी फिल्म काही थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वी दाखविली जात असे. स्वत:च्या बापावर जेवढे प्रेम असेल तितकेच प्रेम नेहरूंवर करणारे लोक प्रचंड संख्येने त्या काळात होते. त्यामुळे कुटुंबकबिल्यासह जणू अंत्यदर्शनासाठी जात आहोत, अशा पद्धतीने लोक ती डॉक्‍युमेंटरी बघत. त्याच कारणास्तव मेन रोडवरच्या चित्रमंदिर सिनेमागृहात सिनेमा बघायला आमचे वडील आम्हा सगळ्यांना घेऊन गेले होते. हा सिनेमा होता शम्मी कपूरचा ‘जंगली’. पूर्वी तो नाशिकला येऊन गेला होता. दुसऱ्यांदा पुन्हा आल्यामुळे पाहायला मिळाला. पण त्या पहिल्यावहिल्या सिनेमापासून शम्मी कपूर जो आवडू लागला तो आजपर्यंत. आजही शम्मी कपूर म्हणजे त्याच्यासारखा तोच आहे आमच्यासाठी!

आठ आणे तिकीट होते स्टॉलचे. स्टॉल म्हणजे पडद्याजवळच्या पहिल्या चार रांगा. पण ते आठ आणे (नवीन भाषेत पन्नास पैसे) घरून मिळत नसायचे. याची कारणे दोन. एकतर घरच्यांकडेच पैशाची तंगी असायची आणि दुसरे म्हणजे, पिक्‍चर पाहायला लागलं याचा अर्थ ‘पोरगं बिघडलं,’ असा होता. त्यामुळे एखाद्या मामाने जरी पैसे दिले तरी पिक्‍चर पाहायला घरून परवानगी मिळणे ही मोठी समस्या असायची. त्यावर मार्ग होता काहीतरी खोटे कारण सांगून बाहेर पडणे आणि पकडले गेल्यास वडिलांचा मार खाणे. सायकलच्या किंवा पानाच्या दुकानावर पिक्‍चरचे पोस्टर्स असायचे. त्या दुकानदारांना शेवटच्या काही आठवड्यांत पिक्‍चरचे फ्री पास मिळत. तर अशा दुकानदारांच्या पोरांशी दोस्ती असली, की एखादा पास कधीमधी मिळून जायचा. विजयानंद आणि मधुकर थिएटरवर आगामी सिनेमाचे फोटो एका शोकेसमध्ये लावलेले असायचे. ते पाहायला जाण्याचापण खास प्रोग्राम असायचा. जुन्या नाशिकमधली बरीच समवयस्क मंडळी थिएटरवर डोअरकीपरचे काम करीत. ते ओळखीचे असायचे. बाल्कनीत बसून सिनेमा पाहण्यासाठी आयुष्याचा बराच काळ जावा लागला.

एखादा सिनेमा मुंबईत वा इतरत्र प्रदर्शित झाल्यानंतर सहा-सात महिन्यांनंतर नाशिकला यायचा. काही वेळा एखादे वर्षही जात असे. काही मंडळी मग हे पिक्‍चर मुंबईला जाऊन पाहून येत असत. तो शौकच तसा येडपट होता. मुंबईहून आधीच पिक्‍चर पाहून आलेला जणू चंद्रावर जाऊन आला आहे अशा थाटात मिरवायचा. अर्थात, तो पिक्‍चर नाशिकला येईपर्यंतच त्याचा हा रुबाब टिकत असे. ‘संगम’, ‘बॉबी’, ‘शोले’ असे काही पिक्‍चर आम्हीपण मुंबईला पाहिलेत.

Web Title: vijayanand theater nashik