मनसेच्या ‘पायाभरणी’वर  भाजपचे इमले..! 

मनसेच्या ‘पायाभरणी’वर  भाजपचे इमले..! 

शहर सौंदर्यीकरणाबरोबरच पर्यटनवाढीचा दूरदृष्टिकोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवत सामाजिक दायित्वाच्या निधीतून सत्ताकाळात शहरात मोठे प्रकल्प दिमाखात उभे केले. एक प्रकारे प्रकल्पांची पायाभरणीच म्हणता येईल. मनसेच्या प्रकल्पांमुळे राज्यभर चर्चा होऊ लागली. किंबहुना प्रकल्प कसे हवेत, हे पाहण्यासाठी नाशिक दौरा करा, असेही ठासून सांगण्यात येऊ लागले. अध्यक्ष राज ठाकरेही आपल्या भाषणात नाशिकचा दाखला देताना दिसले. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर ‘मनसे’च्या याच प्रकल्पांकडे भाजपने दुर्लक्ष केले. यामागे केवळ मनसेने उभारले हा एवढाच उद्देश असल्याने उभारलेल्या प्रकल्पांपैकी काहींची वाताहत झाली, तर काही आजही तितक्‍याच दिमाखात उभे आहेत. प्रकल्पांबाबत सत्ताधारी भाजपने श्रेय घेण्यास सुरवात केली. श्रेयवादात प्रकल्प सुस्थितीत राहतील, याची काळजीही घेणे गरजेचे असताना नेमके त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शहराच्या सौंदर्यीकरणात वाढ करण्याबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रकल्प सत्ताधारी भाजपला अमान्य आहे की काय, असे प्रकल्पांच्या दयनीय अवस्थेतून दिसून येते. 

मनसेने महापालिकेच्या तिजोरीला आर्थिक झळ पोचू न देता सामाजिक दायित्वातून प्रकल्प उभे केले. रिलायन्स, बी. जी. शिर्के, जीव्हीके, टाटा उद्योग समूहाचा नाशिकशी फारसा संबंध नसतानाही या मोठ्या उद्योगांनी नाशिकला सामाजिक दायित्वातून (सीएसआर) चांगले प्रकल्प दिले, पण महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर विद्यमान सत्ताधाऱ्यांनी श्रेय घेण्यापलीकेडे काहीच केले नाही. त्यातून चांगले ते आमचे आणि वाईट ते तुमचे (मनसेचे) ही भावना दिसून येऊ लागली.

  गोदा पार्क 
रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून गोदावरी नदीकिनारी गोदाघाटाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात १.४ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात दीड किलोमीटर गोदाघाटाचे सौंदर्यीकरण केले जाणार होते. पहिल्या टप्प्यातील लॅंडस्केपिंग, कारंजे, आकर्षक सजावटीचे ९० टक्के काम पूर्णत्वास आले. त्यासाठी रिलायन्स फाउंडेशनने सुमारे बारा कोटींचा निधी दिला. मात्र, दुर्दैवाने २०१६ ला गोदावरीला आलेल्या पुरात पहिला टप्पा वाहून गेला. पर्यटनाच्या दृष्टीने प्रकल्प महत्त्वाचा होता. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर रिलायन्स फाउंडेशनसोबत सामंजस्य करार न झाल्याने भग्नावस्थेत असलेला प्रकल्प जशाच्या तसा पडून आहे.

  बोटॅनिकल गार्डन 
नाशिककरांना हक्काचे मनोरंजनाचे ठिकाण उपलब्ध व्हावे म्हणून टाटा ट्रस्टतर्फे पांडवलेणीच्या पायथ्याशी वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या नेहरू उद्यानात बोटॅनिकल गार्डनची उभारणी झाली. त्यासाठी ३५ कोटींचा निधी दिला. अंतर्गत रस्ते, झाडांचे पुनर्रोपण, वनौषधी झाडे, सायकल ट्रॅक, लेझर शो, सोलर कंपाउंड व बोलकी झाडे बोटॅनिकल गार्डनची वैशिष्ट्ये आहेत. वन विभागाकडे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असल्याने महापालिकेला फारसा हस्तक्षेप करता येत नाही. वन विभागाने लेझर शो पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून वर्षभरात दीड कोटीचा महसूलही कमावला. मात्र, पावसाळ्यात लेझर शोची उपकरणे सुस्थितीत न ठेवल्याने पाण्यात भिजून प्रकल्पाची वाताहत झाली. आता प्रकल्प नवीन सुरू करण्यासाठी २० ते २५ लाखांचा खर्च येणार आहे. नाशिककरांसाठी टाटा ट्रस्टने दिलेला प्रकल्पाची वाट लागताना दिसत आहे.

  उड्डाणपुलाचे सौंदर्य 
शहरातून गेलेल्या मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखाली अतिक्रमण होऊन शहराच्या सौंदर्याला बाधा पोचू नये म्हणून उड्डाणपुलाखालील खांब व मोकळ्या जागेत एल ॲन्ड टी कंपनीने सुशोभीकरण केले. पुलाच्या खांबावर नाशिकचे वैशिष्ट्य रेखाटण्यात आले. खासगी कंपनीकडे सौंदर्यीकरणाची जबाबदारी असल्याने अद्याप तरी सौंदर्य टिकून आहे.

  वाहतूक बेटे 
शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी खासगी भागीदारांच्या माध्यमातून चाळीस वाहतूक बेटे विकसित केली होती. शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या शालिमार येथील खाबिया वाहतूक बेटाची दुर्दशा झाली आहे. एबीबी सर्कलवर सिग्नल सुरू करण्यात आल्याने सौंदर्यासाठी उभारलेले योगाचे महत्त्व सांगणारे पुतळे हटविण्यात आले. संदीप फाउंडेशन व मायलॉन बेट सुस्थितीत आहे.

  कलर वॉटर कर्टन 
पुणे येथील बी. जी. शिर्के ग्रुपतर्फे सुमारे ९५ लाख रुपये खर्च करून अहिल्यादेवी होळकर पुलावर पाण्याचा पडदा (कलर वॉटर कर्टन) प्रकल्प उभा केला आहे. पावसाळ्यातील चार महिने प्रकल्प पूर्णपणे बंद होता. पावसाचे कारण देत यंत्रसामग्री काढून ठेवली होती. दुर्लक्षामुळे अद्याप वॉटर कर्टन सुरू करण्यात आलेला नाही.

  चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क 
विद्यार्थ्यांना शालेय वयातच वाहतूक नियमांची माहिती होण्यासाठी मुंबई नाका येथील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क उभारण्यात आले. मायको, लॉइड, महिंद्र कंपन्यांनी त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये आर्थिक मदत केली व नाशिक सिटिझन फोरममार्फत चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क चालविले जाते. हा प्रकल्प सुस्थितीत सुरू आहे. सुदैवाने प्रकल्प सुरू असल्याचे म्हणावे लागेल. मनसेच्या सत्ताकाळात उभारलेला हा एकमेव प्रकल्प सुस्थितीत आहे.

फाळके स्मारक, शिवाजी उद्यानाकडे दुर्लक्ष
मनसेच्या सत्ताकाळात दादासाहेब फाळके स्मारक व शिवाजी उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. फाळके स्मारकाच्या सौंदर्यासाठी महिंद्र कंपनीने पुढाकार घेतला होता. मात्र, सत्तापालट झाल्यानंतर महिंद्रसोबतची चर्चा थांबली व महापालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सौंदर्यीकरण रखडले. सीबीएस येथील उद्यानात आधुनिक पार्किंग व्यवस्था करण्याचे नियोजन महिंद्रने केले होते.

  शंभरफुटी कारंजा 
रामवाडी व अहिल्यादेवी पुलाच्या मधोमध शंभर फुटी कारंजा बी. जी. शिर्के ग्रुपने उभारला होता. नाशिककरांना अद्याप त्या कारंजाचे दर्शन झालेले नाही. पावसामुळे कारंजाची यंत्रसामग्री काढून ठेवावी लागते. पावसाळा संपून महिना उलटला तरी कारंजा सुरू झालेला नाही.

  इतिहास संग्रहालय 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने पहिले इतिहास संग्रहालयाची निर्मिती महाराष्ट्रात झाली. जीव्हीके कंपनीने दोन कोटी रुपये खर्च करून इतिहास संग्रहालय उभारले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आग्रहावरून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जमा केलेली शिवकालिन शस्त्रे संग्रहालयात ठेवली आहेत. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून इतिहास संग्रहालय चालविले जात असले, तरी संग्रहालयाची पुरेशी माहिती पर्यटकच काय, पण नाशिककरांपर्यंत पोचत नसल्याने अल्प प्रतिसाद मिळत आहे.

मनसेच्या सत्ताकाळात नागरिकांचा कररूपी पैसा खर्च न करता प्रकल्पांची उभारणी करण्यात आली होती. मनसेची सत्ता गेल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने प्रकल्पांच्या देखभाल- दुरुस्तीकडे लक्ष देणे अपेक्षित होते, पण दुर्दैवाने तसे न झाल्याने नाशिककर चांगल्या प्रकल्पांना मुकत आहेत.
- ॲड. राहुल ढिकले, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे

प्रकल्प कोणाच्या काळात झाले, याचा विचार न करता सत्ताधारी भाजपने प्रकल्प सांभाळणे गरजेचे होते. प्रकल्प उभारताना महापालिकेचा एक रुपयाचा निधी खर्च झाला नाही, याची जाण सत्ताधाऱ्यांनी ठेवणे अपेक्षित होते. पण मनसेच्या सत्ताकाळात प्रकल्प झाले ही बाब सत्ताधाऱ्यांना खटकत असावी.
- सलीम शेख, मनसे गटनेते

महापालिकेत मनसेची सत्ता असताना सामाजिक दायित्वातून अनेक प्रकल्प उभारले गेले. त्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाल्याने सामाजिक दायित्वाचा निधी वाया गेला आहे. तांत्रिक बाबी पूर्ण करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असताना त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.
- अनिल मटाले, शहराध्यक्ष, मनसे

विकासाला सौंदर्याची दृष्टी देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रयत्नांतून चांगले प्रकल्प उभे राहिले. त्याची वाताहत करण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. रिलायन्स, टाटा उद्योग समूहाने नाशिकमध्ये गुंतवणूक केली. प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक नसल्याचा हा परिणाम आहे.
- पराग शिंत्रे, सचिव संघटक, मनसे

मनसेच्या सत्ताकाळात झालेल्या कामांचे स्मार्टसिटी प्रकल्पात रूपांतर करून सत्ताधारी स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. नाशिककरांसाठी उभारलेले प्रकल्प सुस्थितीत ठेवले, तरी मोठे कार्य भाजपकडून घडेल. 
- ॲड. वैशाली भोसले,  सभापती, पश्‍चिम प्रभाग समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com